नागपुरातील सिताबर्डी मुख्य रस्ता होणार 'व्हेईकल फ्री झोन', लवकरच प्रस्तावावर शिक्कामोर्तब

राजेश प्रायकर
Saturday, 3 October 2020

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सिताबर्डी बाजारपेठत पायी चालून आणि सायकलिंगच्या माध्यमाने 'ओपन स्ट्रीट व्हेहीकल फ्री झोन'बाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली.

नागपूर : स्मार्ट सिटीअंतर्गत प्रदूषणरहित वाहने तसेच पायी चालण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी सिताबर्डी येथील मुख्य रस्ता 'व्हेईकल फ्री झोन' करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात हा प्रस्ताव महापौर व आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. एकूणच केंद्र सरकारचा उपक्रम असल्याने महापौरांकडून या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सिताबर्डी बाजारपेठ पायी चालून आणि सायकलिंगच्या माध्यमाने 'ओपन स्ट्रीट व्हेहीकल फ्री झोन'बाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात ई-पाठशाला शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते. व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, ई-पाठशाला सीबीएसई शाळेचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुंदनवार, मुख्य अध्यापक अनघा परसोडकर, स्वप्ना मेश्राम, उपप्राचार्य श्रीमती ज्योती, केतन जोशी, फन प्लेनेटचे जीतू गोपलानी, पुनम गोपलानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

हेही वाचा - तरुणाईसाठी खुशखबर! फुटाळ्याच्या चेहरामोहरा बदलणार, प्रेक्षक गॅलरीसह संगीत कांरजे वाढविणार आकर्षण

स्मार्ट सिटीचा एकच ध्यास, आजी-आजोबांना मोकळा श्वास, स्मार्ट सिटी बनाने का है इरादा, प्रदूषण मुक्त पर्यावरण का है वादा, अशा बॅनरसह सिताबर्डी बाजारपेठेत जनजागृती करण्यात आली. या बाजारपेठेला व्हेईकल फ्री करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. नागरिकांनी व दुकानदारांनी याला चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पुढील आठवडयात हा प्रस्ताव महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचेकडे परवानगीसाठी पाठविला जाईल, असे मोरोणे यांनी सांगितले. या कार्यक्रमात स्मार्ट सिटीचे अधिकारी डॉ. शील घुले, नेहा झा, डॉ. प्रणीता उमरेडकर, राहुल पांडे, अमित शिरपूरकर, मनीष सोनी, अमृता देशकर, अनूप लाहोटी, डॉ. पराग अरमल, उजवने, अपूर्वा फडणवीस यांनी भाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sitabuldi main road will be vehicle free zone in nagpur