सहाशे किमीचा प्रवास अन १८ तास सर्च ऑपरेशन! 

नरेंद्र चोरे
Friday, 23 October 2020

औरंगाबादमधील रॅकेटमुळे राज्यभरात बोगस उमेदवारांना बनावट प्राविण्य प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथूनच टॅंम्पोलिन क्रीडा प्रकारातील बोगस प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणावर वितरण झाले आहे. आरोपी डमी उमेदवारांकडून तब्बल पाच ते सात लाख रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र द्यायचे, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

नागपूर : शासकीय नोकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांच्या बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांचा बाजार मांडणाऱ्या टोळीचा म्होरक्या अंकुश राठोडला ताब्यात घेण्यात आल्याने आता या प्रकरणात मोठ्या अधिकाऱ्यांसह बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मानकापूर पोलिस ठाण्यातील तपास पथकाने तब्बल सहाशे किमीचा प्रवास आणि १८ तासांच्या सर्च ऑपरेशननंतर हे मिशन यशस्वी केले. 

या प्रकरणात अटक करण्यात आलेले सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांच्या चौकशीदरम्यान मुख्य सुत्रधाराबाबत माहिती मिळाल्यानंतर मानकापूर पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात पथकाने औरंगाबाद गाठून प्रतापगढ नगरातील घरातून अंकुशला ताब्यात घेतले. यावेळी तपास पथकाने अंकुशच्या घरून महाराष्ट्र पोलिसांचा बोर्ड असलेल्या दोन आलिशान गाड्यांसह इतर संशयास्पद साहित्य जप्त केले. ही कारवाई करताना मानकापूर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. नागपूरहून औरंगाबाद असा सहाशे किमीचा प्रवास करून दमलेल्या तपास पथकाने १८ तास दिवसरात्र कोंबिंग ऑपरेशन करून मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतले. याच रॅकेटमधील सहभागी राठोडचा साथीदार पांडुरंग बारगजे व शंकर पतंगे पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बारगजेच्या घरातून पॉवरलिफ्टिंग व इतर क्रीडा प्रकारातील बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. 

 

हेही वाचा :*माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*
 

औरंगाबादमधील रॅकेटमुळे राज्यभरात बोगस उमेदवारांना बनावट प्राविण्य प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथूनच टॅंम्पोलिन क्रीडा प्रकारातील बोगस प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणावर वितरण झाले आहे. आरोपी डमी उमेदवारांकडून तब्बल पाच ते सात लाख रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र द्यायचे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात संतोष राठोड, राजेश वरठी, राघूजी चिलगर, मिलिंद नासरे व हितेश फरकुंडे यांनी ही मोहिम फत्ते केली. 

संघटना विदर्भात अन प्रमाणपत्र औरंगाबादेतून

 
पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील संघटनेचे काम हे विदर्भातील नागपूर आणि अमरावतीतून चालविले जाते. शासनाच्या मंजुरीनुसार याच असोसिएशनचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणासाठी पात्र ठरते. त्यामुळे २०१६ पूर्वी या संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धांतील सहभागाचे प्राविण्य प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याचे मोठे रॅकेट औरंगाबादेतून काम करते.  

 संपादन : नरेश शेळके
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Hundred km Journey and 18 Hours Search Operation!