सहा महिन्यांपासून राज्यातील प्राध्यापक पदभरती लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

राज्यातील जवळपास सर्वच अकृषी विद्यापीठात प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या गुणवत्ता विकासाच्या प्रक्रियेत बराच मोठा अडसर निर्माण झाला होता. दिवसेंदिवस विद्यापीठातून प्राध्यापकांची संख्या कमी होत असल्याने बऱ्याच विभागांमध्ये कंत्राटी आणि तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करून काम भागविले जात होते. विशेष म्हणजे नॅक मूल्यांकनात रिक्त पदांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यापीठांचे मानांकन घसरण्याची चिन्हे दिसून लागली होती.

नागपूर : राज्यातील 12 अकृषी विद्यापीठांसह तीन अभिमत विद्यापीठांना 80 टक्के प्राध्यापक पदांची भरती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. यानुसार रिक्त 1 हजार 166 पदांपैकी 659 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले. मात्र, बऱ्याच विद्यापीठांच्या बिंदुनामावली (रोस्टर) अपूर्ण असल्याने सहा महिने लोटूनही प्रक्रिया पार पडलेली नाही. मात्र, येत्या काहीच दिवसात ही समस्या सोडवून दोन आठवड्यात विद्यापीठांना पदभरतीसाठी जाहिरात काढता येईल, असे आश्‍वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सावंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले.

अवश्य वाचा -  डॉन आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतवणार कोण?

राज्यातील जवळपास सर्वच अकृषी विद्यापीठात प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या गुणवत्ता विकासाच्या प्रक्रियेत बराच मोठा अडसर निर्माण झाला होता. दिवसेंदिवस विद्यापीठातून प्राध्यापकांची संख्या कमी होत असल्याने बऱ्याच विभागांमध्ये कंत्राटी आणि तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करून काम भागविले जात होते. विशेष म्हणजे नॅक मूल्यांकनात रिक्त पदांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यापीठांचे मानांकन घसरण्याची चिन्हे दिसून लागली होती. यातूनच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील 12 अकृषी विद्यापीठे आणि तीन अभिमत विद्यापीठांमधील एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के प्राध्यापकांची भरती करण्याची परवानगी दिली होती. यानंतर रोस्टर अपूर्ण असल्याने मागासवर्गीय कक्षाकडून या पदांना भरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे अद्याप भरती प्रक्रिया पार पडलेली नाही. गुरुवारी राज्यपाल कार्यालयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत यांनी कुलगुरूंनी संवाद साधला. यावेळी बऱ्याच विद्यापीठात पदभरतीसाठी रोस्टर अडचण ठरत असल्याची बाब समोर आली. यावर लवकरच तोडगा काढून दोन आठवड्यांत पदभरतीसाठी विद्यापीठांना जाहिराती देता येईल,असे आश्‍वासन त्यांनी दिले.

मुंबईत सर्वाधिक पदे

राज्यातील विद्यापीठांमध्ये 659 प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होताच, मुंबई विद्यापीठात सर्वाधिक 134 पदे, पुणे विद्यापीठात 111 तर नागपूर विद्यापीठाला 92 प्राध्यापकांची पदे भरण्याची परवानगी मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For six months, the post of professor in the state is pending