गोळीबार चौकातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह, नागपुरातील एकूण संख्या झाली...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

नागपुरात मंगळवारी नारी रोड येथील संतोषनगरात एक नवीन कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यानंतर आता पुन्हा गोळीबार चौक परिसरात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने पुन्हा चिंता व्यक्त केली आहे.

नागपूर : उपराजधानीत कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मोमिनपुरा, सतरंजीपुरा कोरोनाचे हॉटस्पॉट असले तरी, दर दिवसाला एका नवीन वस्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग असलेला एकतरी व्यक्ती आढळत आहे. बुधवारी आणखी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यापैकी पाच जण गोळीबार चौकातील रहिवासी आहेत. तर एक जण गड्डीगोदाम येथील आहे. याचबरोबर उपराजधानीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३८० झाली आहे.

नागपुरात मंगळवारी नारी रोड येथील संतोषनगरात एक नवीन कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यानंतर आता पुन्हा गोळीबार चौक परिसरात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. आजपर्यंत आढळलेल्या ३८० कोरोनाबाधितांपैकी मेडिकल, मेयोतील यशस्वी उपचारातून 293 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे मेडिकल-मेयोच्या कोविड वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या घसरली. संतोषनगरात आढळून आलेल्या व्यक्ती मुंबईला पाईप फिटिंगचा व्यवसाय करतो.

टाळेबंदीत असताना मुंबईत अडकून पडला होता. काम नसल्याने तो इतरांसह पायी नागपूरच्या दिशेने निघाला होता. मुंबईतून बाहेर पडला. येथून पश्‍चिम बंगालकडे जाणाऱ्या एका ट्रक चालकाच्या मदतीने रविवारी नागपूरच्या सीमेत दाखल झाला. मित्रांना फोन करून त्याने बोलावले. दोन मित्र दुचाकीवर त्याला घेण्यासाठी पोहोचले. मुंबई राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने दोघेही मित्र एका वाहनावर होते. दुसरे वाहन परलेल्या मित्राला देत तेथून निघून गेले. 

"रेड झोन'बाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतली ही भूमिका..

स्वतःच पोहोचला महापालिकेच्या रुग्णालयात 
खबरदारीचा उपाय म्हणून संतोषनगर येथील व्यक्ती महापालिकेच्या सदर येथील कोरोना दवाखान्यात गेला. परंतु, ते रुग्णालय बंद होते. यामुळे या व्यक्तीने मेयो रुग्णालय गाठले. परंतु, येथे तापाचे रुग्ण बघणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर तो नारी परिसरातील महापालिकेच्या दवाखान्यात गेला असता तोही बंद असल्याचे निदर्शनात आले. येथून त्याने घरी काही वेळ घालवत पुन्हा त्याने मेयो गाठले. मुंबईहून परतल्याचा इतिहास असल्याने त्याला दाखल करत त्याचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले. सोमवारी मध्यरात्रीनंतर हा व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six more corona positive patients found in nagpur