या शहरात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश; हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागपूरसह पाचही जिल्ह्यांत भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा तसेच लोकसंख्येचा अभ्यास करुन यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे.

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधांची गरज पूर्ण करण्यासाठी विभागात 5 हजार 808 कोरोना योद्धाना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात डॉक्‍टर, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश आले आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागपूरसह पाचही जिल्ह्यांत भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा तसेच लोकसंख्येचा अभ्यास करुन यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे.

वैद्यकीय सुविधांच्या आराखड्यानुसार 393 तज्ज्ञ डॉक्‍टर, 1 हजार 957 डॉक्‍टर, 2 हजार 488 परिचारिका व 970 वर्ग चारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोनाबाधितांना व्हेंटिलेटरपासून स्वतंत्र कोविड हॉस्पिटलमध्ये हाताळण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.

अवश्य वाचा- ओबीसी विद्यार्थ्यांबाबत केंद्राचा अन्यायकारक निर्णय, वाचा काय आहे प्रकार...

मेडिकल आणि मेयोसह वर्धा येथील सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा अभ्यास करुन त्यानुसार राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर चालविण्यासह इतर आवश्‍यक प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आली आहे.

असे आहे नियोजन

कोविडसंदर्भात प्रशिक्षण देण्याच्या नियोजनानुसार विभागात 288 विशेषज्ज्ञ, 996 एमबीबीएस व बीएएमएस डॉक्‍टर, 2 हजार 280 परिचारिका तसेच 996 वैद्यकीय सहाय्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात आले आहे. यापेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय नागपूर शहरात तसेच जिल्ह्यात 180 विशेषज्ज्ञ (स्पेशालिस्ट) 600 एमबीबीएस, बीएएमएस डॉक्‍टर, 1 हजार 380 परिचारिका तसेच 600 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात तसेच राज्यात नागपुरात सर्वाधिक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six thousand warriors ready to fight Corona