ओऽऽ काट! पतंग पकडण्याच्या नादात गेला चिमुकल्याचा जीव; पुलाखाली उघड्यावर राहणाऱ्या मुलाला रेल्वेने चिरडले

अनिल कांबळे
Thursday, 7 January 2021

रेल्वेची जबर धडक एंटाला लागली. त्याच्या शरीराचे चेंदामेंदा झाला. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात ही घटना आल्यामुळे त्यांनी घटनास्थळावर लगेच धाव घेतली. त्यांनी कोराडी पोलिसांना फोन केला. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला.

नागपूर : मकरसंक्रांतीला आठवडाभर वेळ असतानाच नागपुरात पतंगाची ‘ओऽऽ काट’चे आवाज येऊ लागले आहेत. त्यात कटलेली पतंग पकडण्याच्या नादात १२ वर्षीय मुलगा रेल्वे रुळावर पोहोचला. भरधाव रेल्वे आल्याने मुलाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. एंटा विनोद सोळंकी (रा. शिवकृष्णधामजवळ, वॉक्स कुलरच्या ब्रीजखाली, कोराडी) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एंटा हा आपल्या आजीसोबत पुलाखाली उघड्यावर राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आई सोडून गेली. त्याची आजी भीक मागून एंटाचे पालनपोषण करीत होती. त्याचे खरे नाव कुणालाही माहिती नाही. त्याला एंटा म्हणूनच ओळखल्या जाते. तो गेल्या आठ दिवसांपासून आजीला पतंग विकत घेऊन मागत होता. मात्र, त्याच्या आजीची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पतंग मिळाली नाही.

सविस्तर वाचा - मृत्यूच्या दारात असतानाही 'त्याने' दिले तिघांना जीवदान, १९ वर्षीय मुलीचा पुढाकार

त्यामुळे तो रस्त्यावरील किंवा अडकलेल्या पतंग आणि तुटलेला मांजा जमा करून आपला शोक पूर्ण करीत होता. एंटा सोळंकी हा मंगळवारी सकाळपासूनच कटलेल्या पतंग जमा करीत होता. दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारात तो कटलेल्या पतंगाच्या मागे धावत होता. पतंगाकडे लक्ष ठेवत धावताना तो शिवकृष्णधाम झोपडपट्टीजवळील दिल्ली ते नागपूर रेल्वे लाइनवर गेला. या दरम्यान रेल्वे येत होती.

रेल्वेची जबर धडक एंटाला लागली. त्याच्या शरीराचे चेंदामेंदा झाला. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात ही घटना आल्यामुळे त्यांनी घटनास्थळावर लगेच धाव घेतली. त्यांनी कोराडी पोलिसांना फोन केला. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत मेयोत रवाना केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरीत शोककळा; सरपंचांनाही अश्रू अनावर

नायलॉन मांजा विक्री सुरूच

आठ दिवसांतील पतंगाच्या नादात गेलेला हा दुसरा बळी आहे. यापूर्वी एमआयडीसीमध्ये एका कारच्या धडकेत यश नावाच्या १३ वर्षाच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. तर मानकापुरात आदित्य नावाच्या विद्यार्थ्याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला होता. पोलिसांचे लक्ष देत नसल्यामुळे पतंग विक्रेत्यांमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरूच आहे, हे विशेष.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small boy life was lost in the sound of catching a kite in Nagpur city marathi crime news