पांढरे सोनेच उठले शेतकऱ्यांच्या जिवावर; बोंडअळीने मारला डंख

रमेश लांजेवार
Sunday, 4 October 2020

कापूस घरात येण्यापूर्वीच पिकाची शेतातच माती होत आहे. कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी जगतील तरी कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत हाच प्रकार आढळून येत आहे. हवाहवासा वाटणारा पाऊसही आता नकोसा झाला आहे.

कुही (जि. नागपूर) : कापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली जात असली तरी हे पांढरे सोनेच शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. खरीप हंगामात पेरणीच्या कालावधीत बॅंकांनी कर्जास नकार दिला. मात्र, शेतकऱ्यांनी हार न मानता उधार, उसनवारी, खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन कपाशी, सोयाबीनची पेरणी केली. बोगस बियाण्यांचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला. दुबार-तिबार पेरणी करावी लागली. पीक जोमात असतानाच हिरव्या शेंगांना कोंब फुटत असल्याचे बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.

कुही तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते. परंतु, गेल्या काही दिवसांत पावसामुळे कपाशीसह सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू असलेली संकटांची मालिका शेतकऱ्यांना रडकुंडीस आणत आहे. सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटत आहेत. आता सततच्या पावसामुळे बोंडसड होत असल्याने कपाशीचेही पीक धोक्‍यात आले आहे.

अधिक वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

लागवडीचा खर्चही निघू शकत नसल्याने शेतकरी आणखी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. लाखमोलाच्या पिकांची शेतातच होत असलेली माती बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. गुलाबी बोंडअळीनेही डंख मारला आहे. अळीमुळे बोंडाला छिद्र पडते. त्याच छिद्रातून पावसाचे पाणी आतमध्ये शिरत असल्याने बोंड सडत आहे. असा प्रकार जिल्ह्यात सर्वत्र आढळून येत आहे.

कापूस घरात येण्यापूर्वीच पिकाची शेतातच माती होत आहे. कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी जगतील तरी कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत हाच प्रकार आढळून येत आहे. हवाहवासा वाटणारा पाऊसही आता नकोसा झाला आहे.

गरज असते तेव्हा पाठ फिरविणारा पाऊस पिकावर उठला आहे. सततच्या पावसामुळे कपाशीची बोंड गळून पडत आहेत. मॉन्सूनपूर्व कपाशीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बोंडसडचा सर्वाधिक फटका बसला आहे. बोंडाच्या आतमध्ये लाल डाग येऊन कापूस सडत आहे. बोंड सडण्याचा हा नवीनच प्रकार असल्याचे शेतकरी सांगतात.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

‘तात्काळ पंचनामे करा’

सोयाबीनच्या शेंगांना कोंबे फुटली असून, कपाशीलासुद्धा फटका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे हातातील उभे पीक सततच्या पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना तत्काळ मदत देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामस्तरावरील यंत्रणेने नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil in the field of crops worth lakhs