बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

अनिल कांबळे
Thursday, 1 October 2020

सूत्रांच्या माहितीनुसार, खामला आणि कामठीतील दोन पांढरपेशा सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव बाल्या बिनेकर हत्याकांडात समोर येत आहे. खामल्यातील कार्यकर्ता पोलिसांसाठी आरोपी पेश करण्याचे काम करीत होता, तर कामठीतील कार्यकर्ता हा मांडवली बादशहा’ नावाने ओळखल्या जातो

नागपूर : शहरातील चर्चित जुगार अड्डा संचालक किशोर ऊर्फ बाल्या बिनेकर लाईव्ह हत्याकांडात घडविणाऱ्या चेतन हजारेचा सहावा साथीदार आरोपीला पोलिसांनी उमरेडमधून अटक केली. अनिकेत मंथापुरवार, असे आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

रवी उर्फ चिंट्या नागाचारी आणि आदर्श ऊर्फ पप्पू अनिल खरे या दोघांना सोमवारी अटक केली, तर मुख्य आरोपी चेतन सुनील हजारे (३०, बारा सिग्नल, बोरकरनगर, रजत तांबे, आसिम लुडेरकर आणि भरत पंडित यांना रविवारीच अटक करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, खामला आणि कामठीतील दोन पांढरपेशा सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव बाल्या बिनेकर हत्याकांडात समोर येत आहे. खामल्यातील कार्यकर्ता पोलिसांसाठी आरोपी पेश करण्याचे काम करीत होता, तर कामठीतील कार्यकर्ता हा मांडवली बादशहा’ नावाने ओळखल्या जातो. या दोघांच्याही हालचालींवर गुन्हे शाखेने नजर ठेवल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - नागपुरात प्लाझ्मा थेरपी ट्रायलबाबत उदासीनता, ६२ हजार कोरोनामुक्तांपैकी ५० जणांनी केले प्लाझ्मा दान

शनिवारी दुपारी चार वाजता बोले पेट्रोल पम्प चौकात जुगार माफिया बाल्या बिनेकरचा चेतन हजारे आणि टोळीने चाकू-तलवारीने हल्ला करून खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले होते. त्यापैकी चेतन आणि असिम लुडेरकर हे दोघे खामल्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे मदत मागायला गेले होते. तो आरोपींना पेश करणार होता. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला मदत केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तयारी केली होती, अशी चर्चा आहे. 

मोबाईल सीडीआरमध्ये लपले गूढ - 
सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व आरोपींचे मोबाईल सीडीआर काढण्यात येणार आहे. हत्याकांड घडविल्यानंतर आरोपी ज्यांच्या संपर्कात होते, त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. बाल्याचा अन्य दोन जुगार माफियांशी नुकताच वाद झाला होता. त्यामुळे पोलिसांनी बावाजीला चौकशीसाठी उचलले होते. 

हेही वाचा - विद्यापीठाचे 'टेक्नॉलॉजी पार्क' करणार ग्रामविकास, स्थानिक उत्पादन विकसित करण्यावर भर

बर्थडे पार्टीत मर्डर प्लान - 
खामल्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत चेतन आणि साथीदार आले होते. पार्टीतच बाल्याचा मर्डर करण्याचा प्लान बनविण्यात आला. बजाजनगर, अंबाझरी, सीताबर्डी, धंतोली, सदर, जरीपटका आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाल्याचा गेम करायचे ठरले होते. कटानुसार बाल्याचा सीताबर्डीच्या हद्दीत खून करण्यात आल्याची चर्चा आहे. 

कारच्या क्रमांकावरून रेकी -
बाल्याने २०१६ मध्ये रायपूरच्या युवतीला पळवून आणल्यानंतर प्रेमविवाह केला होता. तो कुटुंबीयांपासून दूर काचीपुरा चौकाजवळ किरायाने राहत होता. त्याचा गेम करण्यासाठी कारचा क्रमांक (०२००) टर्निंग पॉइंट ठरला. बाल्याच्याच नातेवाइकाने आरोपींना कारचा नंबर दिला. त्यावरून आरोपींनी त्याच्या घराचा पत्ता काढला आणि रेकी केल्यानंतर गेम केला.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixth accused arrested in balya binekar murder case in nagpur