सौरपंप नादुरुस्त झाल्यास काळजी नको! महावितरण देणार बदलून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

 मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून मिळालेले तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौरपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून मिळणार आहे.

नागपूर  : शेतक-यांसाठी नेहमीच दुष्काळात तेरावा महिना असतो. अस्मानी संकट तर पाचवीलाच पुजलेले. त्यातच ऐन उन्हाळ्या पंप बिघडला तर आणखी संकट. आता मात्र या संकटावर मार्ग निघाला आहे.
 मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून मिळालेले तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौरपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून मिळणार आहे. महावितरणने ही जबाबदारी स्वीकारली असून शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
वादळी पाऊस व गारपिटीने राज्यातील अनेक भागांना तडाखा दिला आहे. गारपिटीने सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त होण्याची शक्‍यता आहे. नादुरुस्त सौरपंप मोफत दुरुस्त करण्याचे किंवा तातडीने बदलून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले असून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली.पहिल्या टप्प्यात 25 हजार सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले. तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील 75 हजार सौर कृषिपंपाचे काम प्रगतिपथावर आहे.
महावितरणने एजन्सीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार शेतात लावण्यात आलेल्या सौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 5 वर्षे तर सौर पॅनलसाठी 10 वर्षांचा हमी कालावधी ठरविण्यात आला आहे. या हमी कालावधीत सौरपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास त्याची मोफत दुरुस्ती करण्याची किंवा सौर कृषिपंप पूर्णपणे बदलून देण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झालेल्या पंपाची दुरुस्ती किंवा बदलून देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप नादुरुस्त झाला असल्यास किंवा सौर पॅनलमध्ये बिघाड झाल्यास 24 बाय 7 सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार दाखल करावी. महावितरणकडून संबंधित एजन्सीला ही तक्रार पाठवून सौर कृषिपंपाची दुरुस्ती करण्याची किंवा तो बदलून देण्याची कार्यवाही करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar pump gets damaged Mahavitaran will replace