मुख्यमंत्री साहेब, आमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी काढा, तीच ओवाळणी समजू.. कोणी घातले असे साकडे.. वाचा...  

योगेश बरवड
रविवार, 2 ऑगस्ट 2020

एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबल्याचे विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यापासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. आधीच कमी पगार असलेल्या या कामगारापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

नागपूर : एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वीच तोट्यात खोलवर रूतले आहे. कोरोना संकटामुळे संचित तोट्यात दर दिवशी भर पडत आहे. सध्या केवळ जिल्हांतर्गत वाहतूक सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत सुरू आहे. बावीस प्रवाशांचीच वाहतूक करण्याचे बंधन असल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे पगार अडकले आहेत. मात्र राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. 

हेही वाचा - हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण...

एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबल्याचे विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यापासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. आधीच कमी पगार असलेल्या या कामगारापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यात प्रशासन रोज वेगवेगळी परिपत्रके प्रसारित करून कामगारांची मानसिकता अधिक हतबल करीत आहे. 

महिला कर्मचारी पुढे सरसावल्या

दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने एसटी कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. वतनाचा प्रश्न मार्गी निघावा यासाठी एसटीच्या महिला कर्मचारी पुढे सरसावल्या आहेत. राखी पौर्णिमेचे औचित्य साधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनातून ओवाळणी स्वरूपात वेतनाचा प्रश्न मार्गी काढण्याचे साकडे एसटीतील या निर्भयांकडून घातले आहे.

क्लिक करा - विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख निवेदन पाठवतील

या आर्थिक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी व कामगारांना त्वरित वेतन मिळावे यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीच्या महिला कामगार सदस्यांकडून मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांना मदतीची विनंती केली आहे. निवेदनातून कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे. प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख निवेदन पाठवतील, अशी माहिती राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी दिली आहे. नागपूरच्या निर्भया सदस्यः मीना केणे-बोंद्रे यांनीही मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांकडे निवेदनातून साकडे घातले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solve problem of our salaries ST women workers seek to CM