'पोलिस समाजाची काळजी घेतील, तुम्ही परिवाराची घ्या'; नागपूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारींची खास मुलाखत  

अनिल कांबळे
Sunday, 11 October 2020

कोरोनाच्या परिस्थितीत आम्ही समाजाची काळजी घेण्यासाठी सज्ज आहे, फक्त तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या असा प्रेमाचा सल्ला गुन्हे शाखेचे नवनियुक्त अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी ‘सकाऴशी बोलताना दिला.

नागपूर : नागपूर हे माझ्या हृदयातील शहर आहे. या शहराबद्दल मला सार्थ अभिमान असून दुसऱ्यांदा येथील नागरिकांची अतिशय कठीण अशा परिस्थितीत सुरक्षा आणि सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हे माझे भाग्य आहे. लहानपणीच्या आणि आताच्या शहरात बराच बदल झालेला असला तरी येथील नागरिक पोलिस प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या परिस्थितीत आम्ही समाजाची काळजी घेण्यासाठी सज्ज आहे, फक्त तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या असा प्रेमाचा सल्ला गुन्हे शाखेचे नवनियुक्त अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी ‘सकाऴशी बोलताना दिला.

प्रश्‍न ः शहरातील वाढती गुन्हेगारीवर अकुंश कसा आणणार ?

उत्तर ः नागपूर ही राज्याची उपराजधानी असली तरी माझी जन्मभूमी आहे. या शहराची ओळख क्राईम सिटी म्हणून होते हा शिक्का पुसण्याचा संकल्प केलेला आहे. त्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई, मोक्का कारवाई, तडीपार, स्थानबद्ध अशा अनेक कारवाया करणार आहे. भविष्यात नागपुरातील गॅंगवार संपुष्टात येतील असा जरब बसविण्याचा प्रयत्न राहील. नागपूर क्राईम सिटी नव्हे तर ऑरेंज सिटी ही जुनीच ओळख देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

प्रश्‍न ः जुगार माफियांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे, ते तोडण्यासाठी काय कराल?

उत्तर ः शहरात नुकताच एका जुगार माफियाचा खून झाला यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या नेटवर्कची संपूर्ण माहिती गोळा झालेली आहे. त्यामुळे येत्या काळात आक्रमक कारवाई आणि कठोर पावले उचलण्यात येतील. असे अड्डे उधवस्त करण्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत. त्यानंतर जुगार माफियांचे धाबे दणाणतील.

सायबर गुन्हेगारांनी चांगलाच जोर धरला आहे, त्यासाठी विशेष काय उपाययोजना आहेत?

उत्तर ः ऑनलाईन व्यवहार वाढू लागल्याने सायबर गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. ते आपली क्लुप्ती लावून गुन्हे करीत असतात. पण आता त्यांच्यावर करडी नजर राहणार असून त्यासाठी सायबर पोलिस ठाणे सज्ज झालेले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना सायबरचे प्रशिक्षणही देण्यात आलेले आहेत. तक्रारदारांनी निर्भीडपणे समोर यावे आम्ही अशा गुन्ह्यांची गंभीरतेने दखल घेऊ.

भूमाफियांवर अंकूश ठेवण्यासाठी काय योजना आहे?

उत्तर ः शहरात भूमाफियावर आळा घालण्यासाठी फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीचा अभ्यास करण्यात येईल. चुकीच्या पद्धतीने काही घडत असेल तर त्यावर अंकुश आणणे पोलिसांचे कामच आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार एसआयटी स्थापन करण्याचेही नियोजन आहे. यानंतर भूमाफियांवर कडक कारवाई केली जाईल.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

अधिवेशनाच्या बंदोबस्ताचे नियोजन कसे राहिल?

उत्तर ः हिवाळी अधिवेशनाच्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यासह इतरही सर्वच मंत्री शहरात असतात. त्याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करीत असते. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गुन्हे शाखेवर मोठी जबाबदारी असते. त्यामुळे आतापासूनच त्यासाठी काही उपाययोजना तयार करीत आहेत.

संपादन -  अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Interview of Additional Commissioner of Police Sunil Fulari