कोरोना काळात मुलांना द्या जास्तीत जास्त वेळ; डॉ. बोधनकर, डॉ. शिवलकर यांचा नागरिकांना सल्ला

राजेश प्रायकर 
Thursday, 15 October 2020

मुलांच्या विकासासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी या काळात त्यांच्यासोबत वेळ घालवा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर आणि बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयश्री शिवलकर यांनी दिला.

नागपूर : कोरोनामुळे लहान मुले, किशोर आणि कुमारांच्या आयुष्यातही मोठा बदल झाला. शाळा, कॉलेज, ट्यूशन बंद झाल्याने मुले घरीच आहेत. त्यांना मोबाईल, टिव्हीचे व्यसन जडले आहे. कोरोनाने कुटुंबासोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी दिली आहे. 

मुलांच्या विकासासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी या काळात त्यांच्यासोबत वेळ घालवा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर आणि बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयश्री शिवलकर यांनी दिला.

नागपुरातही आहे 'आजीचा ढाबा', दहा रुपयात देते चार डोसा; गरजूंना आहे मदतीची गरज

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता.१२) डॉ. उदय बोधनकर, डॉ.जयश्री शिवलकर आणि सोहम फाउंडेशनचे अध्यक्ष संजय अवचट यांनी ‘कोव्हिड काळात बालकांचे लसीकरण आणि मुलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

देशात दरवर्षी सुमारे ५ लाख बालके लसीकरणाअभावी दगावतात. कोव्हिडच्या काळात लसीकरण न झालेल्या बालकांची संख्या मोठी असून ते धोकादायक आहे. शहरामध्ये मोफत लसीकरणासाठी ५० केंद्र आहेत त्यांचा लाभ घ्या. बाळ जन्मत:च त्याला टीबीची लस दिली जाते. चुकली असल्यास ५ वर्षाच्या आत ती बाळाला देणे आवश्यक आहे. 

याशिवाय पोलिओची लसही महत्वाची आहे. मिझल्स रुबेला (एमआर), रोटा या लसीही बालकांना देणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार ज्या बालकांना या सर्व लस वेळेवर देण्यात येत आहेत. त्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे दिसून आल्याची माहिती यावेळी डॉ. उदय बोधनकर यांनी दिली. ..

एकाच वेळी निघाली दोघींची अंत्ययात्रा; एकीच्या नशिबी शेवटचे सोपस्कारही नाही

लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीही काही लस महत्वाच्या आहेत. त्यासुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. जयश्री शिवलकर यांनी मुलांची मानसिकता आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. पालकांनी स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतानाच मुलांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे बोलणे, वागणे याकडे लक्ष द्या, त्याचे निरीक्षण करा. सद्याच्या काळात मुलांचे मित्र बनून त्यांची जीवनशैली सुलभ करण्याकडे भर द्या, असे आवाहन त्यांनी केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spend more time with children in corona time