तस्कर बाहेर तर पोलिस जेलमध्ये,पोलिस विभागात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

बुधवारी रात्री 8.40 वाजेच्या सुमारास केडीके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आरोपी एका दुचाकीने संशयास्पदरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची अंगझडती घेतली. यावेळी जावेदकडे 7 ग्रॅम एमडी सापडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

नागपूर : मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात नंदनवन पोलिसांना यश आले. शेख जावेद शेख रहमान (36) रा. उस्मानिया मशिदीजवळ, नंदनवन) आणि मोहम्मद अब्दुल गुलाम अब्दुल खलील (24, रा. जाफरनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

केडीके महाविद्यालय परिसरात काहीजण एमडी या अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती नंदनवन पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पी. एन. बारड, स्नेहलता जायभाये, संजय शाहू, संदीप गवळी, विकास टोंग, भीमराव ठुंबरे, राजेश बहादे, प्रवीण भगत आणि विनोद झिंगरे यांनी सापळा रचला होता. त्यावेळी बुधवारी रात्री 8.40 वाजेच्या सुमारास केडीके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आरोपी एका दुचाकीने संशयास्पदरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची अंगझडती घेतली. यावेळी जावेदकडे 7 ग्रॅम एमडी सापडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एमडी, चार मोबाईल आणि एमएच-31, डीडब्ल्यू-1767 क्रमांकाची दुचाकी जप्त केली. पोलिस निरीक्षक पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

पोलिसांचाच गेम
गेल्या 14 ऑक्‍टोबरला पोलिस विभागात खळबळ उडविणारी घटना घडली होती. नंदनवन ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगान, रोशन निंबर्ते आणि अभय मारोडे यांनी ड्रग्ज तस्कर जावेदला ताब्यात घेतले होते. या प्रकरणात जप्त एमडी आणि अडीच लाख रुपये पोलिसांनी हडपले होते. या प्रकरणात जावेदने "तुलसी'च्या मदतीने नंदनवन पोलिसांचा "गेम' केला होता. या कांडात अडकलेले पाच पोलिस कर्मचारी अद्यापही जेलमध्ये आहेत तर तस्कर जावेद हा जामिनावर बाहेर आला.

जमाल गेला कुठे?
ज्या जमालला 34 ग्रॅम ड्रग्जसह नंदनवन पोलिसांनी अटक केली होती तो सध्या अटकेबाहेर आहे. जमाल हाच मुख्य ड्रग्ज तस्कर असून त्याचे अनेक एजेंट कार्यरत आहेत. एनडीपीएसनेही जमालचा शोध आणि तपास थंडबस्त्यात ठेवला आहे. "तुलसी' नावाच्या महिलेने वरिष्ठांची दिशाभूल करून नंदनवन पोलिसांवर ट्रॅप केल्याची चर्चा आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spirituous smuggling in KDK college area in Nagpur