नागपूर विभागाचा दहावीचा निकाल 93.84 टक्के, गोंदिया जिल्हा विभागात प्रथम

मंगेश गोमासे
Wednesday, 29 July 2020

विभागात गोंदिया जिल्ह्याने 95.22 टक्‍क्‍यासह प्रथम स्थान पटकाविले. सर्वात कमी निकाल वर्धा जिल्ह्याचा 92.10 टक्के लागला आहे. नागपूर जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावित, 94.66 तर भंडारा जिल्ह्याने 94.41 टक्के निकाल देत तिसरे स्थान पटकाविले.

नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या निकालात नागपूर विभागाचा निकाल 93.84 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी पेक्षा निकालात 26.57 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. विभागात गोंदिया जिल्ह्याने बारावीप्रमाणेच आघाडी घेत, दहावीतही 95.22 टक्‍क्‍यांसह विभागातून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलीच आघाडीवर आहेत.

राज्यात 3 मार्च ते 23 मार्चदरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्यात. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे 23 मार्चचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. यानंतर या विषयासाठी एकूण पेपरच्या सरासरी गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. त्यानुसार बुधवारी (ता.29) निकालाची घोषणा करण्यात आली. परीक्षेसाठी 1 लाख 62 हजार 664 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 लाख 61 हजार 388 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 51 हजार 444 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. निकालाची टक्केवारी 93.84 इतकी आहे. याशिवाय विभागात गोंदिया जिल्ह्याने 95.22 टक्‍क्‍यासह प्रथम स्थान पटकाविले. सर्वात कमी निकाल वर्धा जिल्ह्याचा 92.10 टक्के लागला आहे. नागपूर जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावित, 94.66 तर भंडारा जिल्ह्याने 94.41 टक्के निकाल देत तिसरे स्थान पटकाविले.

मुलीच हुशार
दहावीच्या निकालात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 75 हजार 368 म्हणजेच 95.78 टक्के मुली दहावीत उत्तीर्ण झाल्यात. याशिवाय 76 हजार 76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी 91.99 इतकी आहे.

नागपूर विभाग निकाल दहावी

  • भंडारा- 94.41%
  • चंद्रपूर- 92.44%
  • नागपूर- 94.66%
  • वर्धा- 92.10%
  • गडचिरोली- 92.69%
  • गोंदिया- 95.22%
  • एकूण निकाल- 93.84%

 

  • विद्यार्थी- 91.99
  • विद्यार्थींनी - 95.78
  • एकूण निकाल 93.84

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 723 विद्यार्थी 90 टक्‍के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

45 ते 60 टक्‍क्‍यादरम्यान 41 हजारावर विद्यार्थी
नागपूर विभागाचा दहावीचा निकालात यावर्षी 7.87 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत 90 टक्के घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी 90 टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 385 इतकी होती. मात्र, यावर्षी 90 टक्के मिळविणाऱ्यांची संख्याही 3 हजार 338 ने वाढली आहे. त्याची टक्केवारी 2.78 इतकी आहे.
मागील वर्षीच्या निकालात मोठी घट झाली होती. त्यामुळे 45 ते 90 टक्के गुण मिळविणाऱ्यांच्या संख्येतही घट दिसून आली होती. मात्र, यावर्षी निकाल सुधारल्याने ते चित्र बदलले. त्यामुळे 45 ते 90 टक्के मिळविणाऱ्यांच्या आकड्यात बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे 90 टक्‍क्‍यापेक्षा अधिक गुण असलेल्यांची संख्या 4 हजार 723, 85 ते 90 टक्के मिळविणारे 8 हजार 287, 80 ते 85 टक्के मिळविणारे- 12 हजार 401 विद्यार्थी आहेत. सर्वाधिक विद्यार्थी 45 ते 60 टक्‍क्‍यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. निकालात त्यांची टक्केवारी 24.46 टक्के असून 41 हजार 538 विद्यार्थी त्यात उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल 45 टक्‍क्‍यापेक्षा कमी गुण मिळालेल्या 28 हजार 548 विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांची टक्केवारी 16.81 इतकी आहे. यावर्षी निकालात सुधारणा झाल्याने जवळपास अकरावीच्या प्रवेशावरही त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

टक्केवारी -                           उत्तीर्ण विद्यार्थी -                               एकूण निकालातील टक्केवारी
90 टक्केपेक्षा अधिक -                 4,723                                                  2.78
85 ते 90 टक्के-                          8,287                                                  4.88
80 ते 85 टक्के                          12,401                                                7.30
75 ते 80 टक्के                          15,867                                               9.34
70 ते 75 टक्के                          17,987                                             10.59
65 ते 70 टक्के                          19,320                                             11.38
60 ते 65 टक्के                          21,157                                             12.46
45 ते 60 टक्के                          41,538                                             24.46
45 च्या खाली                           28,548                                             16.81

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC result declare