यंदा हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचेच; प्रशासनाची तयारी; ५० कोटींचा खर्च

निलेश डोये 
Sunday, 11 October 2020

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. नागपूर कराराप्रमाणे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काँग्रेसच्या काही नेत्यांनी अधिवेशनाला विरोध दर्शवला आहे.

नागपूर : पावसाळी अधिवेशन तीन दिवसात आटोपल्याने हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे चालणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळण्याची तयारी सरकारने केली आहे. दुसरीकडे प्रशासनाने अधिवेशनाची तयारी सुरू केली असून ५० कोटीच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. नागपूर कराराप्रमाणे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काँग्रेसच्या काही नेत्यांनी अधिवेशनाला विरोध दर्शवला आहे. यावर होणार खर्च कोरोनासाठी खर्च करण्याची मागणी होत आहे. 

ठळक बातमी - ‘मुलाचा अपघात झाला, किती जखम झाली, पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही’; भीक मागण्याची नवी पद्धत

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत आग्रही आहे. ठरल्यानुसारच अधिवेशन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दोन आठवड्यांचा हा कार्यक्रम आहे. ७ डिसेंबर ते १८ डिसेंबरपर्यंतचा हा कार्यक्रम आहे. असे असले तरी एक आठवड्याचा जादा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना विधान परिषद सभापती यांनी दिल्या आहेत.

१९ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार प्रश्न

पावसाळी अधिवेशन कमी दिवसांचे असल्याने तारांकित प्रश्न वगळण्यात आले होते. तारांकित प्रश्न वगळल्याने चांगलाच विरोध झाला होते. यावेळी ते स्वीकारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रश्नांसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत सूचना करायच्या आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील प्रश्न सूचना १० नोव्हेंबरपर्यंत करायच्या आहे.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

५० कोटींचा खर्च

अधिवेशनासाठी विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास सॅनिटाईझ करण्यात येणार असून देखभाल दुरुस्ती तसेच रंगरंगोटीचे काम करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मंडप डेकोरेशन व इतर कामेही करण्यात येणार असून यावर ५० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. नुकतेच विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाल्याचा माहिती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state governemnt is ready to take Winter assembly of 2 weeks