आजारी पत्नीसाठी उन्हातान्हात वणवण, वाचा मन हेलावणारी पंड्याची कहाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

मागील महिन्याभरापासून तो नागपुरातील सीमावर्ती भागात गूळ विकण्याचा व्यवसाय करीत आहे. त्याच्या बोलण्यात नम्रता आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या त्याच्या दुकानात नेहमीच गर्दी दिसते. विशेष असे की, त्याची ही कथा त्याने सांगितली नाही, तर सोबतीला आलेल्या एका व्यक्तीने सांगितली.

नागपूर : नाव पंड्या. मूळचा तमिळनाडूतील. पत्नी तेथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. खिसा रिकामा झाल्याने तो कामाच्या शोधात पत्नीला रुग्णालयात सोडून महाराष्ट्रात आला. पत्नीच्या उपचारासाठी 400 किलोमीटर अंतर कापून नागपूरच्या सीमावर्ती भागात तो रोजंदारीवर गूळ विकत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याचा गुण अंगी असल्याने तो दिवसरात्र काम करीत आहे. गूळ विकून मिळालेल्या पैशातून पत्नीच्या आजाराचा खर्च केला. उरलेसुरले पैसे भूक भागवण्यासाठी कामी येत आहेत. अडचणीच्या वेळी हातावरील रेषा नाही तर व्यवसायाची हातोटी कामी आली.

सविस्तर वाचा - परीक्षेला जाताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

पंड्या याच्या कुटुंबाचे मजुरीवरच पोट भरते. कुटुंबाचा गाडा कसाबसा चालत असतानाच अचानक त्याची पत्नी आजारी पडली. दोन महिन्यांपासून तिच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. खिशात अधिकचा पैसा नाही. यामुळे उपचारातही हयगय सुरू होती. अशा अडचणीत सापडल्यानंतर मुले आई...आई म्हणून रडत होती. अशा वेळी एकांतात एकटाच गुडघ्यात चेहरा झाकून रडायचा व मन हलके करायचा.
त्याच्या घराच्या बाजूलाच एक व्यापारी राहायचा. त्याला पंड्याचे दुःख कळले. त्याचे मन हेलावले. तमिळनाडूत असले तरी दोघांचीही भाषा भिन्न होती. तो काय बोलतो, काय मागतो हे कळत नाही. त्याच्या हातावर व्यापाऱ्याने पैसे ठेवले. परंतु, स्वाभिमानी पंड्याने नकार दिला. पुन्हा-पुन्हा त्याला पैसे देण्यासाठी हात पुढे येत होते; परंतु तो मानेनेच नकार देत होता. अखेर रोजंदारीवर काम मिळावे यासाठी पंड्या तयार झाला. रोजंदारीवर काम करण्याची मागणी लक्षात आली. त्यांने रोजंदारीवर काम दिले. ऍडव्हान्स म्हणून व्यापाऱ्याने दिलेले पैसे घेत उपचार सुरू केले. पंड्याने नजरेनेच व्यापाऱ्याचे आभार मानले.
मागील महिन्याभरापासून तो नागपुरातील सीमावर्ती भागात गूळ विकण्याचा व्यवसाय करीत आहे. त्याच्या बोलण्यात नम्रता आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या त्याच्या दुकानात नेहमीच गर्दी दिसते. विशेष असे की, त्याची ही कथा त्याने सांगितली नाही, तर सोबतीला आलेल्या एका व्यक्तीने सांगितली.

साडेसहा वाजता रस्त्यावर थाटतो दुकान
अधिक पैसा गोळा करण्यासाठी पंड्या पहाटे साडेसहापासून वर्धा मार्गावर उभा असतो. ताडीपासून आलेमिश्रित तयार केलेला गूळ खरेदी करण्यासाठी ग्राहक चारचाकी थांबवतात. व्यापाऱ्याची गुळाची गाडी दूर असते. आणि हा गूळ विकण्यासाठी तमिळनाडूतून पन्नासपेक्षा अधिक मजूर रोजंदारीवर काम करीत आहेत. या प्रत्येक रोजंदार कामगारांची वेगळी दु:खद कहाणी आहे. सारे कुटुंब सोडून नागपुरात येऊन रोजंदारीवर काम करतात. त्यांच्या खानपानाची व्यवस्था दिलदार व्यापारी करतो. आणि त्यांच्या हातावर रोजंदारीचे चारशे रुपये दर दिवसाला ठेवतो. दिवसभराच्या मिळकतीवर पंड्या समाधानी आहे. दररोज 400 रुपये गाठीला पडत असल्याने तो अधिक जोमाने काम करीत आहे. लवकरच तमिळनाडूकडे रवाना होईन, असे तो सांगत होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of Tamilnadu"s Pandya