नातेवाईकांनी केली विनवणी ‘डॉक्टर साहेबऽऽ आणखी पन्नास हजार रुपये देतो, पण मृतदेह घेऊन जाऊ द्या’

गजानन बोरकर
Saturday, 10 October 2020

नातेवाईकांनी आणखी ५० हजार रुपये देतो, मृतदेह देण्यासाठी विनवणी केली. परंतु, डॉक्टरांनी पूर्ण पैसे जमा केल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिला. मृताचे नातेवाईक सुरेंद्र खंडारे यांनी पैशासाठी मृतदेह देत नसल्याची तक्रार नवीन कामठी पोलिसांत दिली. डाॅक्टरांनी मृतदेह न दिल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलसमोर रास्तारोको केला.

कामठी (जि. नागपूर) : कामठी कळमना मार्गावरील खुशबू मोटारसमोरील लाईफलाईन या खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाच्या बिलावरून नातेवाईक व डॉक्टरांमध्ये झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. मृतदेह मिळण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सायंकाळी कामठी कळमना मार्गावर रास्तारोको केल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प होती. नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केल्याने तणाव निवळला.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश महादेव तांबे (वय ४८, रा. लष्करीबाग, नागपूर) या कोरोना रुग्णाला नातेवाईकानी २८ दिवसांपूर्वी उपचारासाठी कामठी कळमना मार्गावरील खुशबू मोटारसमोरील लाईफलाईन या खाजगी कोविड सेंटरमध्ये भरती केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. ९) त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान नातेवाईकांनी तीन लाख ५० हजार रुपये हॉस्पिटलमध्ये जमा केले होते.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

आज पुन्हा डॉक्टरांनी मृताचे नातेवाईकांना ४ लाख ९५ हजार रुपये भरणार नाहीत तोपर्यंत मृतदेह देणार नसल्याचे सांगितल्यामुळे नातेवाईक संतापले. नातेवाईकांनी आणखी ५० हजार रुपये देतो, मृतदेह देण्यासाठी विनवणी केली. परंतु, डॉक्टरांनी पूर्ण पैसे जमा केल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिला. मृताचे नातेवाईक सुरेंद्र खंडारे यांनी पैशासाठी मृतदेह देत नसल्याची तक्रार नवीन कामठी पोलिसांत दिली. डाॅक्टरांनी मृतदेह न दिल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलसमोर रास्तारोको केला.

नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बाकल, दुय्यम निरीक्षक राधेश्याम पाल घटनास्थळी येऊन नातेवाईक व डॉक्टरांसोबत मध्यस्ती समजूत घातली. नातेवाईकांनी एक लाख रुपये दिल्यावर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांना दिला. कामठीतील काही खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या नावावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची लुबाडणूक होत असून, अशा खाजगी कोविड हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stress from a dead patient's bill in kamthi