परीक्षा व निकालांवर संपाचे संकट

मंगेश गोमासे
Sunday, 4 October 2020

आंदोलनाच्या स्थगितीनंतर विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे ठरवीत तारखांची घोषणा केली. बहुतेक परीक्षेची तयारी आधीच पूर्ण झाली होती, आता कर्मचारी संप संपल्यामुळे परीक्षा घेण्यात काहीच अडचण नाही. ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा संपवून विद्यापीठाकडून सर्व निकाल १५ नोव्हेंबरपूर्वी जाहीर करण्याची तयारी आहे.

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर १७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचारी आंदोलन स्थगित झाल्यावर परीक्षांची घोषणा करण्यात आली. मात्र, आश्वासन पूर्ण न झाल्यास ऐन परीक्षेच्या कालावधीत आंदोलन सुरू झाल्यास परीक्षा पुन्हा संकटात सापडण्याची भीती आहे.

आंदोलनाच्या स्थगितीनंतर विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे ठरवीत तारखांची घोषणा केली. बहुतेक परीक्षेची तयारी आधीच पूर्ण झाली होती, आता कर्मचारी संप संपल्यामुळे परीक्षा घेण्यात काहीच अडचण नाही. ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा संपवून विद्यापीठाकडून सर्व निकाल १५ नोव्हेंबरपूर्वी जाहीर करण्याची तयारी आहे.

विद्यापीठाच्या पुढे ढकललेल्या परीक्षा पुढील आठवड्यापासून, नवे वेळापत्रक जाहीर

मात्र, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचाऱ्यांनी १९ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापूर्वीही मागील सरकारकडून अशाच प्रकारे वारंवार देण्यात आलेल्या आश्वासनाला कंटाळून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. आता हे ही आश्वासन पोकळ निघाल्यास पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेवरील संकट अद्याप टळले नसल्याचे दिसून येते.

ॲपवरील तक्रारी कायम
विद्यापीठाची सर्व तयारी असली तरी परीक्षा अ‍ॅप संदर्भात अद्यापही विद्यापीठाकडे रोज तक्रारी येत आहेत. अनेकांना अ‍ॅप डाउनलोड होत नाही. तर काहींकडे झाल्यावर ती उघडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे ॲपवरील प्रवेशपत्रावरील विषय आणि महाविद्यालयात पाठविण्यात आलेल्या प्रवेशपत्रातील विषय वेगवेगळे असल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत. याबाबत बोलताना परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या या समस्यांची विद्यापीठाला जाणीव असून त्या आज सायंकाळपर्यंत सोडविण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strike crisis over exams and results