सर्वकाही फोटोसाठी; नवीन पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वागतामागे काय आहे रहस्य?

अनिल कांबळे
Sunday, 4 October 2020

पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात किंवा पोलिस ठाण्यात जाऊन सत्कार कार्यक्रम आयोजित करण्याची सुपारी देतात. सामाजिक कार्यकर्त्याची ठराविक रक्‍कम त्याला द्यावी लागते. तसेच सत्कार करण्याच्या दिवशीचा पूर्ण खर्च (दारू-मटण) अवैधधंदे चालकाला करावा लागतो.

नागपूर : कोणत्याही शहरात नवीन वरिष्ठ पोलिस अधिकारी रूजू झाले की त्यांच्या स्वागतासाठी सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू होते. नागपुरात उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु, अद्याप ते रुजू झालेले नाही. तरीसुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वागतासाठी हारतुऱ्यांची जुळवाजुळव सुरू केल्याची माहिती आहे. पण हा सर्व खटाटोप कशासाठी, याचे गुढ सामान्य नागरिकांना कधी उलगडलेच नाही. पण या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये छोट्यामोठ्या अवैध व्यावसायिकांचा समावेश असतो.

पोलिस अधिकारी रूजू होताच अनेक संघटना आणि गटातटाचे कार्यकर्ते पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन हारतुरे देत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करतात. हारतुरे देण्यासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते आपल्या चमूमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक आणि अवैध धंदेचालकांना हळूच घुसवतात. पोलिस अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून मग अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना दाखवून अवैध धंदे सुरू करतात, अशी माहिती समोर आली आहे.

जाणून घ्या - अंडी, चिकनमध्येच नाही तर या दहा गोष्टीतूनही मिळते प्रोटीन; जास्त ताकदीसाठी करा सेवण

एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी रूजू झाल्यानंतर अवैध धंदेचालक परिसरातील सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरतात. त्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात किंवा पोलिस ठाण्यात जाऊन सत्कार कार्यक्रम आयोजित करण्याची सुपारी देतात. सामाजिक कार्यकर्त्याची ठराविक रक्‍कम त्याला द्यावी लागते. तसेच सत्कार करण्याच्या दिवशीचा पूर्ण खर्च (दारू-मटण) अवैधधंदे चालकाला करावा लागतो.

त्या सामाजिक कार्यकत्याला दरमहिन्याला खर्चपाण्यासाठी पैसे द्याव लागतात. हा सर्व खटाटोप केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता वस्तीतील काही महिला तसेच बेरोजगार युवकांना हाताशी धरतो. अधिकाऱ्यांचा दिवस आणि वेळ ठरवून मोठा पुष्पगुच्छ घेऊन १५ ते २० जणांचा जत्था पोलिस उपायुक्त कार्यालयात किंवा पोलिस ठाण्यात धडकतो. अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो.

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

सबकुछ फोटोसाठी

पोलिस अधिकारी रूजू झाल्यावर सत्कार कार्यक्रम फक्त फोटो काढण्यासाठी असतो. एकदा फोटो काढला की त्यानंतर कार्यकर्तेसुद्धा गायब होतात. तो फोटो घेऊन कार्यकर्ते पोर्टल, यु-ट्यूब चॅनल आणि वॉट्सॲपला डीपी ठेवण्यासाठी वापरतात. पोलिस अधिकाऱ्यांनी जर फोटो काढण्यास नकार दिल्यास त्या अधिकाऱ्यांकडे कुणी फिरकतही नाही. कारण, येथे त्यांचा उद्देशच मोडीत निघालेला असतो.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Struggling to welcome new police officers