विद्यार्थ्यांचे कागदपत्र क्वारंटाइन

नीलेश डोये
रविवार, 7 जून 2020

विद्यार्थी गावी असून त्यांना या क्वारंटाइन केंद्रातच जाता येत नाही. कागदपत्राअभावी समोरील वर्षाच्या प्रवेशावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून पावसामुळे कागदपत्र खराब होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे. 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांना क्‍वारंटाइन केंद्र करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ ते सोडावे लागले. काही दिवसच वसतिगृह क्वारंटाइन केंद्र राहणार असल्याच्या अपेक्षेने विद्यार्थी शैक्षणिक कागदपत्र येथेच सोडून गेले. विद्यार्थी गावी असून त्यांना या क्वारंटाइन केंद्रातच जाता येत नाही. कागदपत्राअभावी समोरील वर्षाच्या प्रवेशावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून पावसामुळे कागदपत्र खराब होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे. 
कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासकीय इमारतीसोबत नागपूर विद्यापीठाचे वसतिगृहांना क्वारंटाइन केंद्र बनविण्यात आले. शाळा, कॉलेज बंद करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिृगह सोडण्यास सांगण्यात आले. पंधरा-वीस दिवसांचा वेळ काढायचा असल्याने विद्यार्थी आपले सर्व शैक्षणिक साहित्यासोबत कादगपत्र येथेच सोडून गेले. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचे कागदपत्र दुसऱ्या रूममध्ये ठेवण्यात आलेत. संपूर्ण वसतिगृह क्वारंटाइन केंद्र असल्याने कोणत्याही व्यक्तीस येथे प्रवेशास मनाई आहे.

हेही वाचा- आरटीई प्रवेशाकडे सरकारचे दुर्लक्ष, ही आहेत कारणे... 

बहुतांश विद्यार्थी गावाकडे परत गेले आहेत. या विद्यार्थ्यांना येणे अवघड आहे. आता नवीन वर्षाचा अभ्यासक्रमासोबत प्रवेशाचा वेळ आला आहे. समोरील अभ्यासक्रमात प्रवेशासाठी कागदपत्रांची आवश्‍यकता आहेत. पावसाच्या पाण्यामुळे कागदपत्र खराब होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्याचे विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षणच वाया जाण्याचा भीती व्यक्त होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली. यामुळे हे कागदपत्र विद्यार्थ्यांच्या नातेवाईकास देण्याची मागणी होत आहे. परंतु या विषयावर विद्यापीठ प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. 

विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष घालून लॉकडाउन शिथिलतेच्या काळात वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विशेष वेळ देऊन त्यांचे कागदपत्रे आणि इतर सामान घेऊन जाण्याची लवकरात लवकर परवानगी दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सहमतीनंतर कागदपत्र नातेवाईकास द्यावे, अशी मागणी मनपा आणि विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 
आशिष फुलझेले, प्रमुख, मानव अधिकार संरक्षण मंच. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students documents quarantined