अरे हे काय, परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना केले नापास

मंगेश गोमासे 
Monday, 23 November 2020

परीक्षेत काही विद्यार्थ्यांना पास तर काही विद्यार्थ्यांना नापास केल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पास करणे अयोग्य असल्याचे कारण देत यूजीसीने अंतिम वर्षाची परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. 

नागपूर : राज्यात कोरोनाची स्थिती बघता अंतिम वर्ष वगळता इतर सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना पास करणे गरजेचे होते. परंतु, जी परीक्षा झालीच नाही तिचा निकाल लावल्याचा प्रताप नागपूर विद्यापीठाने केला. 

विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी असाच प्रकार विद्यापीठात घडला आहे, हे विशेष. एवढेच नाही तर या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना पास तर काही विद्यार्थ्यांना नापास केल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पास करणे अयोग्य असल्याचे कारण देत यूजीसीने अंतिम वर्षाची परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. 

त्यानुसार राज्य शासनाने विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बोलून अंतिम वर्ष वगळता इतर सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला़. या निर्णयानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने शिकवणीला सुरुवातही करण्यात आली. ज्या सत्रातून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. त्याची परीक्षाही नागपूर विद्यापीठाकडून घेण्यात आली नाही.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का
 

त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे बंधनकारक होते. मात्र, ज्या सत्राची परीक्षाच घेण्यात आली नाही. तिचा चक्क नागपूर विद्यापीठाने निकाल घोषित केला. एवढेच नव्हे तर या निकालात काही विद्यार्थ्यांना चांगल्या गुणाने पास केले व काही विद्यार्थ्यांना नापास केले. 

८ नोव्हेंबरला विद्यापीठाने निकाल लावला. त्यात दीक्षाभूमी महाविद्यालयाचे २७ विद्यार्थी नापास झाले. हे विद्यार्थी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे गेले असता कुलगुरूंनी महाविद्यालयावर सर्व जबाबदारी ढकलल्याचे समजते. मात्र, महाविद्यालय विद्यापीठावर जबाबदारी ढकलत असल्याने विद्यार्थ्यांचा चेंडू झालेला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय या सर्व सेमिस्टरच्या १५ विषयांचे पेपर द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत सापडले आहे.

अन्यथा विद्यापीठासमोर आंदोलन

याबाबत काही विद्यार्थ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, विद्यापीठाने कुठलीही परीक्षा न घेताच निकाल जाहीर केला. त्यात काही विद्यार्थ्यांना पास तर काही विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले़. विद्यापीठाने एकतर सर्वांनाच पास करावयास हवे होते किंवा सर्वांनाच नापास. परंतु, त्यांनी तसे न करता विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला आहे. विद्यापीठाने आम्हाला नापास व इतरांना पास कुठल्या निकषावरून केले ते सांगावे, अन्यथा आम्ही विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला़ आहे. 

संपादन : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students failed without taking the exam