
पकडलेल्या आरोपींजवळील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळ वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तयार केलेले फासे, कुऱ्हाड, सुरी, तांदूळ, ब्लॅंकेट व इतर साहित्य आढळून आले.
गडचिरोली : वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात गस्त घालत असताना वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी संशयित फिरणाऱ्या दहा आरोपींपैकी चार शिकाऱ्यांना वनविभागाच्या गस्ती पथकाने साहित्यासह अटक केली. ही कारवाई बामणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या रोमपल्ली जंगलातील राखीव वनखंड क्र. एस. ए. ०४७ येथे केली. उर्वरित सहा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. मेंगा बंडे मडे, बंडे फकिरा मडे, मल्ला जोगा गावडे व गिरावली वेलादी अशी अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बामणी वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्रातील अधिकारी किशोर गौरकार, क्षेत्र सहायक बोरकर, वनरक्षक पी. बी. महाडोरे, वनरक्षक पी. आर. पाटील, वनरक्षक एस. जी. बोंडे, वनरक्षक तलांडी हे वाघाचा मागोवा घेण्यासाठी रोमपल्ली जंगलातील राखीव वनखंड क्र. एसए ०४७ मध्ये गस्त करीत होते.
दरम्यान, त्यांना दहा लोक जंगलामध्ये संशयितरीत्या फिरताना आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी त्यांना थांबायला सांगितले असता ते पळायला लागले. वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून मेंगा मडे, बंडे मडे, मल्ला गावडे व गिरावली वेलादी या चार आरोपींना पकडले.
उर्वरित सहा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपींजवळील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळ वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तयार केलेले फासे, कुऱ्हाड, सुरी, तांदूळ, ब्लॅंकेट व इतर साहित्य आढळून आले.
अधिक वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय
यावरून वनाधिकाऱ्यांनी चारही आरोपींना अटक करून अहेरी येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी ठोठावली आहे. फरार झालेल्या सहा आरोपींचा वनाधिकारी शोध घेत असून घटनेचा अधिक तपास सहायक वनसंरक्षक एस. जी. बडेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार करीत आहेत.
संपादन - नीलेश डाखोरे