पालक विचारताहेत, 'ये इलू-इलू क्‍या है?'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

आता ऑनलाइन वर्गात अनेक विद्यार्थ्यांचे मन रमेनासे झाले आहे. प्रारंभीची पाच-दहा मिनिटे विद्यार्थी ऑनलाइन वर्गात लक्ष घालतातही. मात्र, पालकांचे दुर्लक्ष होताच चित्रपट सुरू केले जात असल्याची बाबही पुढे येऊ लागली. पालकांकडून ऑनलाइन वर्गासंदर्भातील विविध तक्रारींचा पाढा वाचला जात असतानाच आता वेगळाच प्रकार समोर आला आहे. 

नागपूर : विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग पालकांसाठी वेगळ्या कारणासाठी डोकेदुखी ठरत आहेत. मुलांच्या हाती मोबाईल नको म्हणणारे गुरुजी आता मोबाईलवरून वर्ग घेत आहेत. मात्र, ऑनलाइन वर्गादरम्यान अल्पवयीन विद्यार्थ्यांचे चक्क 'इलू-इलू' रंगत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात पालकांडून तक्रारीही येऊ लागल्या आहेत. पण, ऑनलाइन शिक्षण हे सरकारचे धोरण असल्याने आपण काहीच करू शकत नाही, अशी हतबलता मांडून गुरुजी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

कोरोनाच्या दहशतीतून यंदाच्या सत्रातील शालेय परीक्षा रद्द करण्यात आल्या. परंतु, पुढच्या वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि शिक्षणाची गोडी कायम राहावी, यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाइन वर्गामुळे विद्यार्थी सतत मोबाईल हाताळत असल्याची ओरड यापूर्वीच झाली आहे. आता ऑनलाइन वर्गात अनेक विद्यार्थ्यांचे मन रमेनासे झाले आहे. प्रारंभीची पाच-दहा मिनिटे विद्यार्थी ऑनलाइन वर्गात लक्ष घालतातही. मात्र, पालकांचे दुर्लक्ष होताच चित्रपट सुरू केले जात असल्याची बाबही पुढे येऊ लागली. पालकांकडून ऑनलाइन वर्गासंदर्भातील विविध तक्रारींचा पाढा वाचला जात असतानाच आता वेगळाच प्रकार समोर आला आहे. 

वर्ग सुरू असतानाच अन्य समाजमाध्यमांवरून विद्यार्थ्यांचे चॅटिंग सुरू असते. त्याही पुढे जात घनिष्ट मैत्री असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीत प्रेमाचे संवाद रंगू लागले आहे. चुकून हा संवाद डिलीट करायचे राहिल्याने काहींचे बिंगही फुटले आहे. कुही तालुक्‍यातील एका गावात अशाच प्रेमसंवादातून चांगलेच महाभारत रंगले. पोलिसांकडे जाणे टाळून दोन्ही पक्ष गुरुजींकडे तक्रारी घेऊन पोहोचले. गुरुजींनी त्यांची अडचण मांडली. मुलांवर लक्ष देण्याचा सल्ला देत कशीबशी दोन्ही पक्षांची समजूत काढली. 

हेही वाचा : रात्री घरी उशिरा पोहोचल्याने घरचे रागावले; मग त्या मुलींनी घेतला हा निर्णय...

नंदनवन भागातील एका शाळेलासुद्धा अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले. संबंधित मुलीचे वडील तक्रार घेऊन गुरुंजींकडे पोहोचले. प्रसंग बाका असल्याचे चाणाक्ष गुरुजींनी ओळखले. थेट सरकारकडे अंगुलीनिर्देश करीत आपली हतबलता मांडली. यानंतर सरकार, शाळा प्रशासनाच्या नावे बोटे मोडीत मुलीचे वडील निघून गेले. ही प्रातिनिधिक उदाहरणे पालकांना काळजीत टाकणारी आहेत. अनुचित प्रकार टाळायचे असतील, तर पालकांनाच ऑनलाइन वर्गात रस घ्यावा लागणार, असे मत यानिमित्ताने व्यक्त होऊ लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students online classes are a headache for parents