गुरुजी मोजताहेत उडत्या पाखराची पिसे...ऑनलाइन शिक्षणात अळीमिळी गुपचिळी

योगेश बरवड
शुक्रवार, 22 मे 2020

शासकीय व शासनमान्य शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत गुंतलेल्या शिक्षकांना सकाळी उठताच विषय तज्ज्ञाचा फोन येतो. 'किती पोरांनी अभ्यासमालेचा वर्ग पाहिला, आकाशवाणीची गोष्ट किती मुलांनी ऐकली', अशी विचारणा केली जाते.

नागपूर : 'उडत्या पाखराची पिसे मोजणे' या प्रचलित म्हणीचा अनुभव शिक्षक दररोजच घेत आहेत. सध्या घरी बसून त्यांना ऑनलाइन शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांची आकडेवारी दररोज द्यावी लागत आहे. प्रत्यक्ष आकडेवारी घेणे अशक्‍य, म्हणून अनेक गुरुजी मनात येईल ती आकडेवारी देत आहेत. वरिष्ठांनाही या प्रकाराची पूर्ण जाणीव आहे. पण, नाइलाज असल्याने अळीमिळी गुपचिळीचा प्रकार औपचारिकतेसाठी सुरू आहे. 

कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ कायम राहावी, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शासकीय व शासनमान्य शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत गुंतलेल्या शिक्षकांना सकाळी उठताच विषय तज्ज्ञाचा फोन येतो. 'किती पोरांनी अभ्यासमालेचा वर्ग पाहिला, आकाशवाणीची गोष्ट किती मुलांनी ऐकली', अशी विचारणा केली जाते.

आता कुणाकडेच रेडिओ शिल्लक राहिला नाही. पण, शासकीय यंत्रणेकडून जेवढे मोबाईल तेवढे रेडिओ, असे गृहीत धरण्यात आले आहे. मोबाईल असला तरी ग्रामीण भागात किती जणांकडे इयरफोन, हेडफोन आहे, रेडिओ कोण ऐकतो, हा प्रश्‍नच आहे. त्यातही कुणी मोबाईलवर अभ्यासमाला ऐकलीच तरी ती किती वेळ याबाबत सस्पष्टता होत नाही. अनेक मुले दोन मिनिटे आकाशवाणी ऐकतात अन्‌ पटकन 'सिंगम' लावला जातो. यामुळे विद्यार्थ्यांची खरी आकडेवारी देणे अशक्‍यप्राय आहे. तरीही शासकीय औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आकडा रोजच्या रोज शिक्षकांकडून दिला जातो. ही आकडेवारी वरिष्ठांकडून त्यांच्या वरिष्ठांकडे जशीच्या तशी वर्ग केली जाते.

हेही वाचा : कोरोना तपासणीत हयगयीला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाची विचारणा 

शिक्षकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच ही बोंब माहिती आहे. विद्यार्थ्यांना किती आणि काय समजले या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यापेक्षा शासकीय आदेशाच्या "खानापूर्ती'चे तळमळीने पालन केले जाते. अनेक दुर्गम भागांमध्ये आजही रेडिओचे सिग्नल पोहचू शकत नाही, या विद्यार्थ्यांपर्यंत शासनाची अभ्यासमाला आणि आकाशवाणीवरील गोष्टी कशा पोहोचतील, याचा विचारही कुठेच होताना दिसत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students statistics are incorrect