अल्पवयीन मुलांना नको त्या गोष्टींचा हव्यास; ऑनलाईन शिक्षणामुळे जडली ही घाणेरडी सवय, पालकांसमोर नवा प्रश्न

मंगेश गोमासे
Saturday, 5 September 2020

शिक्षक शिकवीत असताना विद्यार्थी गेम खेळणे, मित्रांशी चॅट करणे आणि पॉर्न बघणे आदी उद्योग करीत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडे बऱ्‍याच तक्रारी आहेत. विशेष म्हणजे यापैकी ४० टक्के विद्यार्थी पॉर्न बघण्याच्या आहारी गेले आहेत.

नागपूर : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर शाळा आणि महाविद्यालयांचा भर आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये पॉर्न बघण्याची सवय वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. ४० टक्के विद्यार्थी पॉर्न बघण्याच्या आहारी गेले असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत शहरातील पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोविडच्या प्रादुर्भावामुळे सरकारने ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. शिक्षकांनी ऑनलाइन लेक्चर्स, वर्कशिट्स, व्हिडिओच्या माध्यमांतून शिकविण्यास सुरुवात केली. यासाठी एकेकाळी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवणाऱ्या पालकांनीच विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिलेत. शाळा व महाविद्यालयांचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले. मात्र, विद्यार्थी मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेण्याऐवजी इतर गोष्टींकडे अधिक लक्ष देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अधिक माहितीसाठी - भावी लष्करी अधिकार्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेर्या

शिक्षक शिकवीत असताना विद्यार्थी गेम खेळणे, मित्रांशी चॅट करणे आणि पॉर्न बघणे आदी उद्योग करीत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडे बऱ्‍याच तक्रारी आहेत. विशेष म्हणजे यापैकी ४० टक्के विद्यार्थी पॉर्न बघण्याच्या आहारी गेले आहेत. अनेकदा हे शिक्षकांना कळत असल्याने त्यांनी याबाबत पालकांना माहिती देत विद्यार्थ्यांना त्यापासून दूर नेण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

मनसेची तक्रार

ऑनलाइन शिक्षणात पालकांकडून कमी वयोगटातील किशोर वर्गीय विद्यार्थ्यांच्या हातात ऑनलाइन शिकवणी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट मोबाईल व कॉम्प्यूटर दिले जात आहे. या माध्यमातून येणाऱ्या अश्लील व्हिडिओ व इतर गोष्टींकडे किशोरवयीन तसेच युवावर्ग आकर्षित होण्याची संभावना अधिक आहे. यामुळे व्हॉट्सअॕप आणि फेसबुकवरील व्हिडिओ अॕप आणि इंटरनेटवरील अश्लील संकेतस्थळ, पोर्नोग्राफी साइट्स तसेच नावावर प्रसारित होणाऱ्या ‘ए’ ग्रेड चित्रपट व वेबसिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर तात्काळ बंदी लावण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नागपूर उपशहर अध्यक्ष कल्पना चव्हाण यांनी केली आहे.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students watch dirty movies in the name of online education