उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या मॅटकडून रद्द

नीलेश डोये
Thursday, 22 October 2020

न्यायालयाने तीन आठवड्याच्या आत सर्वांना मुळ ठिकाणी नियुक्ती देण्याचे आदेश दिल्याने शासनाला नव्याने बदलीची प्रक्रिया करावी लागणार आहे.

नागपूर : तीन उपविभागीय अधिकऱ्यांसह दहा तहसीलदार यांच्या बदल्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या (मॅट) नागपूर खंडपीठाकडून रद्द करण्यात आल्या. तीन आठवड्यात सर्वांना त्यांच्या मुळ जागी नियुक्ती देण्याचे आदेश.

नागपूर विभागीत तहसीलदार संतोष खांडरे (हिंगणा, जि. नागपूर), अरविंद हिंगे (कामठी, जि. नागपूर),दीपक करांडे (सावनेर, जि. नागपूर), रोहिणी पाठराबे (नागपूर), प्रीती डुडुलकर (नागपूर), उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत (हिंगणघाट, जि. वर्धा), उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे (ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) व उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर (मौदा, जि. नागपूर) तसेच अमरावती विभागातील तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे (मलकापूर, जि. बुलडाणा), शीतल रसाळ (खामगाव, जि. बुलडाणा), उदयसिंग राजपुत (अमरावती), कुणाल झालटे (यवतमाळ), राहुल तायडे (नांदुरा, जि. बुलडाणा) यांची बदली करण्यात आली होती. कोणतेही कारण न देता तसेत वेळ (ड्यु) नसताना बदली केली. शिवाय तक्रारीही नसल्याने या सर्वांनी बदल्यांच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिले.

विधान परिषदेच्या पटलावर शिक्षक, पदवीधरांचा आवाज राहणार मौन; कार्यकाळ संपला, अधिवेशनापूर्वी निवडणुकीची शक्यता नाही

न्यायाधीश आनंद करंजकर यांनी अर्जदारांचे मुद्दे ग्राह्य धरत बदलीचे आदेश अवैध ठरवत तीन आठवड्यात सर्वांना त्यांच्या मुळ जागेवर नियुक्ती देण्याचे आदेश दिले. अर्जदाराकडून ॲड. काकाणी व ॲड. भुसारी तर सरकारकडून ॲड. घोंगरे यांनी बाजू मांडल्याचे सांगण्यात आले.

बदल्यांची कसरत करावी लागणार नव्याने
तहसीलदार संतोष खांडरे यांच्या जागी अक्षय पोयाम, अरविंद हिंगे यांच्या जागी गणेश जगदाळे तर दीपक करांडे यांच्या प्रताप वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायालयाने तीन आठवड्याच्या आत सर्वांना मुळ ठिकाणी नियुक्ती देण्याचे आदेश दिल्याने शासनाला नव्याने बदलीची प्रक्रिया करावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sub-Divisional Officers, Tehsildars Transfers canceled by MAT