कोरोना रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका निघाली. मग झाले असे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

काही स्वयंसेवी संस्थानी दान केलेल्या तीन ते चार रुग्णवाहिका आहेत. मात्र, कालबाह्य रुग्णवाहिकेतून रुग्णांना नेण्यात येत आहे

नागपूर : आशिया खंडातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कोविड हॉस्पिटल दर दिवसाला कोणत्या ना कोणत्या घटनेने चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी कोविड हॉस्पिटलच्या जेवणात अळ्या आढळून आल्याची बाब उजेडात आली.

लॉकडाऊनच्या काळात लागली सॅनिटायझरची लत, परंतु आता भोगावे लागले गंभीर परिणाम... 

तर आठ ते दहा कोरोना रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका कोविड हास्पिटलमधील रॅम्पवरून निघाली असताना अचानक या रुग्णवाहिकेचे ब्रेक फेल झाले आणि रुग्णवाहिका प्रवेशद्वारावर आदळली. सारे कोरोना रुग्ण रुग्णवाहिकेच्या सीटवरून खाली पडले. कोरोनाबाधित किरकोळ जखमी झाले. 

शनिवारी मध्यरात्रीनंतरची ही घटना. रात्री बाराच्या ठोक्‍यानंतर मेडिकलची रुग्णवाहिका (एमएच31क-7348) कोविड 19 हॉस्पिटलमधून सुमारे 8 ते 10 कोरोनाबाधितांना दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करण्यासाठी निघाली. या हॉस्पिटलच्या रॅम्प वर येताच ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

ब्रेक लावण्याच्या प्रयत्नात ही रुग्णवाहिका कोविड हॉस्पिटलच्या गेटवर धडकली. रुग्णवाहिकेत बसलेले सारे कोरोनाबाधित एकमेकांच्या अंगावर आदळले. यात किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर म्हणून सारे कोरोनाबाधित बचावले. मोठी घटना टळली. या प्रकरणांची कोणतीही नोंद पोलिसात करण्यात आली नाही. 

18 वर्षे जुनी रुग्णवाहिका 
मेडिकलमधील ही रुग्णवाहिका 18 वर्षे जुनी आहे. जीर्ण तसेच कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णांची ने-आण केली जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या रुग्णवाहिकेला फिटनेस प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

काही स्वयंसेवी संस्थानी दान केलेल्या तीन ते चार रुग्णवाहिका आहेत. मात्र, कालबाह्य रुग्णवाहिकेतून रुग्णांना नेण्यात येत आहे. याशिवाय याच रुग्णवाहिकेतून कोरोनाचे रुग्ण तसेच कोरोनाचा मृतदेह घेऊन जात असल्याची चर्चा मेडिकलच्या कर्मचाऱ्यांमध्ये होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suddenly the brakes of ambulance failed