वादावादीत पतीने घेतला गळफास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

सुंदरसिंगने सर्वप्रथम विष प्राशन केले. त्यानंतर त्याने छताच्या बल्लीला साडी बांधून गळफास लावला.

नागपूर : कौटुंबिक कलहातून झालेल्या वादावादीत पतीने सर्वप्रथम विष प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर मृत्यू होणार की नाही, याची शाश्‍वती नसल्यामुळे त्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना एमआयडीसी हद्दीत जयताळा येथे घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरसिंग बाबुराव सालवे (37) हा टाटा एस गाडीवर चालक म्हणून कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. या कारणावरून त्याचा पत्नीसोबत वाद होत होता. याच कारणावरून सोमवारी सकाळी त्याचा पत्नीसोबत वाद झाला. त्याची पत्नी माहेरी निघून गेली. सुंदरसिंगने सर्वप्रथम विष प्राशन केले. त्यानंतर त्याने छताच्या बल्लीला साडी बांधून गळफास लावला.

काही वेळानंतर सुंदरसिंगचा साळा त्याच्या घरी आला असता आतून दार बंद होते. साळ्याने लाथ मारून दार उघडले असता सुंदरसिंग गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला.

काय आहे या लिंकमध्ये? - आश्रमशाळा अधीक्षकाने शाळेत घेतला गळफास

पायऱ्यांवरून पडून वृद्धाचा मृत्यू 
पायऱ्या चढत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने कसबा, हिंगणा येथे राहणारे गजानन चिंतामण साखरे या 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी 3च्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी गजानन हे आपल्या घरी पायऱ्यांवरून वरच्या मजल्यावर जात होते. अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. त्यांना खासगी हॉस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

 

ऑटोतील चोरांनी मंगळसूत्र पळविले

 ऑटोतून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगमधून चोरांनी 25 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. 23 डिसेंबरला दुपारी 4.30च्या सुमारास सिंदी, कारबा रोड (जि. वर्धा) येथे राहणाऱ्या आशा भरत चौधरी (53) ह्या पतीसह नागपूरला आल्या होत्या. छत्रपती चौकातून त्या ऑटोत बसल्या आणि मानेवाडा चौकात उतरल्या. प्रवासादरम्यान ऑटोतील चोरांनी चौधरी यांची हॅंडबॅग उघडून त्यात ठेवलेले 25 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide from family conflicts