शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर झाली सोडचिठ्ठी; तरी दोन महिन्यांनी सासरी आली पत्नी अन् घडला पुढील प्रकार

मनोहर घोळसे
Saturday, 23 January 2021

कल्याणीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्‍याचे नमूद केल्याने पोलिसांनी कल्याणीचे पती प्रवीण दाजीबा पगारे व कुटुंबातील इतर सहा जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सावनेर (जि. नागपूर) : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मौजा ढालगाव खैरी गावात घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढालगाव खैरी येथील प्रवीण दाजीबा पगारे आणि कळमेश्वर तालुक्यातील झुमकी सावळी येथील कल्याणी महादेव वाघमोरे यांचा २०१६ मध्ये विवाह झाला. तेव्हापासून ढालगाव खैरी येथील पगारे दापत्याचा संसार सुरू असताना घरगुती वादामुळे पती-पत्नीत खटके उडाले. यातून त्यांची दोन महिन्यांपूर्वी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर सोडचिठ्ठी झाली आणि पत्नी कल्याणी माहेरी निघून गेली.

मात्र, या आपसी सोडचिठ्ठीनंतर कल्याणी सोमवारी (ता. १८) ढालगाव खैरी येथील पतीच्या घरी आली आणि घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये तिने गळफास घेतला. कल्याणीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्‍याचे नमूद केल्याने पोलिसांनी कल्याणीचे पती प्रवीण दाजीबा पगारे व कुटुंबातील इतर सहा जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीसाठी - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच करू शकले नाही

यातील आरोपी प्रवीण दाजीबा पगारे (३२), जगदीश दाजीबा पगारे (३७) व दाजीबा महादेव पगारे (६०) यांना अटक करून आरोपींची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत असून, उर्वरित तीन आरोपींंचा शोध घेण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a married woman due to her father in laws troubles Nagpur crime news