बायकोच्या जिवापेक्षा दुचाकी प्यारी... गरीब सासरा कुठून आणणार वारंवार पैसे?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

सासरच्या जाचाला कंटाळून रोशनीने वडिलांकडे दोन ते तीनदा पैशांची मागणी केली. मात्र, वडीलही मोलमजुरी करणारे असल्यामुळे पैशाची जुळवाजुळव होऊ शकली नाही. त्यामुळे पती अमितने रोशनीला बेदम मारहाण करणे, शौचालयात कोंडणे, उपाशी ठेवणे, थंडीत बाहेर झोपवणे, मुलाला हात लावू न देणे आदी प्रकारचा छळ सुरू केला.

नागपूर : तीन वर्षांपूर्वी रोशनीचा विवाह झाला. वर्षभर संसार सुरळीत सुरू होता. पती-पत्नीत कोणत्याही कारणावरून वाद होईल असे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मात्र, वर्षभरातच पतीची दुचाकी विकत घेण्याची इच्छा झाली. मोलमजुरी करीत असल्याने ते शक्‍य नव्हते. यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. सततच्या तगादाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. रोशनी अमित वर्मा (वय 26, रा. गुलशननगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी रोशनीचा विवाह शिवनगरात राहणाऱ्या अमित वर्मा (वय 30) याच्याशी झाला. अमित मोलमजुरीचे काम करतो. त्यांना दीड वर्षाचा मुलगाही आहे. सुरुवातीला वर्षभर त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अमितला दुचाकी विकत घ्यायची होती. पैसे नसल्याने तो निराश झाला होता. कोणत्याही परिस्थितीत दुचाकी विकत घ्यायची असल्याने तो रोशनीला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता. तसेच सासरा मेहतराम वर्मा आणि सासू कौशल्या वर्मा यांनीही तिला माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला.

सविस्तर वाचा - चहाटपरी हटविल्याने दिव्यांग तरुणाने केले असे...

सासरच्या जाचाला कंटाळून रोशनीने वडिलांकडे दोन ते तीनदा पैशांची मागणी केली. मात्र, वडीलही मोलमजुरी करणारे असल्यामुळे पैशाची जुळवाजुळव होऊ शकली नाही. त्यामुळे पती अमितने रोशनीला बेदम मारहाण करणे, शौचालयात कोंडणे, उपाशी ठेवणे, थंडीत बाहेर झोपवणे, मुलाला हात लावू न देणे आदी प्रकारचा छळ सुरू केला. यामुळे त्रस्त झालेल्या रोशनीने वडिलाकडे जाऊन पैशाची व्यवस्था करण्यास सांगितले. 

25 हजार दिल्यावरही पैशांची मागणी

मुलीचा सासरचे छळ करीत असल्याने वडिलाने एका सावकाराकडे जाऊन 25 हजार रुपयांचे कर्ज काढून रोशनीला दिले. रोशनीने पतीचे घर गाठून सासू-सासऱ्यांकडे 25 हजार रुपये दिले. काही दिवस रोशनीला होत असलेला मानसिक त्रास थांबला होता. मात्र, अचानक पती अमितने पुन्हा पैशासाठी रोशनीला माहराण करणे सुरू केले. माहेरून पैसे न आणल्यास तुला घटस्फोट देईल, अशी धमकी दिली.

अवश्य वाचा - तू दुसऱ्याशी लग्न करू नको; माझ्याशी संबंध ठेव, तुझा व मुलीचा पूर्ण खर्च उचलतो

वडिलांनी दिला होता धीर
एकदा पैसे दिल्यावरही सासरच्यांनी परत पैशांची मागणी केली. कर्जबाजारी वडिलांना पुन्हा कर्जबाजारी करण्याची रोशनीची इच्छा नव्हती. ही बाब रोशनीने वडील सुखचैन वर्मा यांना बोलून दाखवली होती. वडिलांनी तिला धीर धरण्यास सांगून कुठूनतरी पुन्हा कर्ज काढून सासरच्या मंडळीला पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र, रोशनी यासाठी तयार नव्हती. 

मुलासमोरच घेतला गळफास
वडिलांची आर्थिक स्थिती पाहता रोशनीने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. रोशनीने शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरात कुणीही नसताना दीड वर्षाच्या मुलासमोरच सिलिंग फॅनला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी रोशनीच्या वडिलाच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by married women in Nagpur