पालकांनो सांभाळा आपल्या मुलांना! अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

आयूष अनुत्तीर्ण झाला होता. तेव्हापासून तो नैराश्‍यात होता. घरातही तो शांत राहत होता. तसेच तो कमी बोलत होता.अनुत्तीर्ण झाल्याची खंत आणि अभ्यासाचा ताण यामुळे तो तणावात होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
 

नागपूर : बारावीची परीक्षा तोंडावर आल्याने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वानाडोंगरीत उघडकीस आली. आयुष क्षीरसागरजी भोयर (वय 17, महाजनवाडी-वानाडोंगरी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षीरसागरजी भोयर केंद्र सरकारच्या एका विभागात नोकरीवर आहेत. ते पत्नी व दोन मुलांसह गेल्या काही महिन्यांपूर्वीच वानाडोंगरीतील निलगिरी अपार्टमेंट, कांचनगंगा-2 येथील पहिल्या माळ्यावर राहायला आले होते. मोठा मुलगा आयुष हा बाराव्या वर्गात शिकत आहे तर लहान 13 वर्षाचा मुलगा आठवीत आहे. आयुष शांत स्वभावाचा होता. तो अभ्यासात पाहिजे तेवढा हुशार नव्हता. त्यामुळे त्याला अभ्यासाचे नेहमीच टेंशन यायचे. त्यासाठी त्याने फ्रेंड्‌स सर्कलही वाढविले नाही. घरात एकाकी राहून अभ्यास करण्यावर त्याचा भर होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या भीतीपोटी तणावात होता. मात्र, याकडे पालकांचे लक्ष गेले नाही. सोमवारी पहाटे पाच वाजता तो झोपेतून उठला आणि "फिरून येतो' एवढे बोलून बाहेर पडला. तो थेट इमारतीच्या चवथ्या माळ्यावर गेला आणि तेथून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आईला मोठ्याने आवाज आल्यामुळे तिने गॅलरीतून डोकावून पाहिल्यानंतर एकच हंबरडा फोडला. आईवडील धावपळ करीत खाली पोहचले. त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसीच्या पोलिस उपनिरीक्षक कविता कोकणे यांनी सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
सविस्तर वाचा - धिक्‍कार धिक्‍कार...नराधम पित्याने केले पोटच्या मुलीशी कुकर्म

जेईई एक्‍झाममध्ये झाला होता अनुत्तीर्ण
आयूष याने जेईई एक्‍झाम दिली होती. काही दिवसांपूर्वीच या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत आयूष अनुत्तीर्ण झाला होता. तेव्हापासून तो नैराश्‍यात होता. घरातही तो शांत राहत होता. तसेच तो कमी बोलत होता.अनुत्तीर्ण झाल्याची खंत आणि अभ्यासाचा ताण यामुळे तो तणावात होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

पालकांनो सावधान...
अनेक पालक आपल्या मुलांना "रॅट रेस'मध्ये ढकलतात. आपला मुलगा पहिल्या तीन क्रमांकात आला पाहिजे, अशी अपेक्षा मुलांकडून ठेवतात. त्यामुळे मुलेसुद्धा जीव तोडून अभ्यास करतात, मात्र, अपयश आल्यास नैराश्‍यात जातात. तणावात जीवन जगतात. एकाकी पडतात. हिनभावना त्यांच्यात निर्माण होते. विद्यार्थी दशेत न पेलणारे ओझे त्यांच्या डोक्‍यावर पालक ठेवतात. त्यामुळे पाल्य खचून जातात. आता पालकांनी डोळे उघडायला हवे, आपल्या पाल्यांकडून नाहक अपेक्षा ठेवून त्याच्या जीव मेटाकूटीस आणल्यास त्याच्यावर मानसिक परिणाम पडू शकतो, ही बाब पालकांनी लक्षात घ्यायला हवी.
पालकांनी धडा घ्यावा
पालकांनी पूर्ण न होऊ शकलेल्या अपेक्षा पाल्यांकडून ठेवल्यामुळे असे प्रकार उघडकीस येत आहेत. येत्या महिन्याभरात दहावी-बारावीच्या परीक्षा आहेत. अशा घटनांमधून पालकांनी धडा घ्यायला हवा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मकता येऊन असे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्‍यता जास्त असल्याची माहिती मानसोपचारतज्ञ प्रा. राजा आकाश यांनी दिली.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide of one student in Nagpur