मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

दोघांनाही एकाच वेळी मोबाईल वापरायचा होता. शेवटी आईने मध्यस्थी करीत भावाकडे मोबाईल देण्यास सांगितले. त्यामुळे साक्षीला राग आला. तिने आतमधल्या खोलीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तासभर झाला तरी साक्षी बाहेर आली नाही, म्हणून तिच्या आईने घरात जाऊन बघितले असता तिच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता.

नागपूर : मोबाईलसाठी भावाबहिणीमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यामुळे रुसलेल्या बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हुडकेश्‍वरमधे उघडकीस आली. साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय 19, रा. श्‍यामनगर, हुडकेश्‍वर रोड, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी शेंदेकर ही बिंझाणी कॉलेजमध्ये बी.ए. पदवीच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. तिला लहान भाऊ बारावीत शिक्षण घेतो. वडील जांबुवंतराव हे त्रिमूर्तीनगर चौकात खासगी कंपनीत कार्यरत आहेत. तर तिचा भाऊसुद्धा खासगी काम करतो. घरी स्मार्टफोन विकत घ्यावा म्हणून दोघेही बहीणभावाने वडिलांकडे तगादा लावला होता. मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी महिनाभरानंतर घरात स्मार्टफोन घेतला. दोघेही खूश झाले. साक्षी आणि तिचा भाऊ आळीपाळीने मोबाईल वापरत होते. भाऊ घरी असला की तो तासभर मोबाईलवर पब्जी खेळत होता तर साक्षीही व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवर वेळ घालवत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दोघे बहीणभावातून मोबाईलसाठी भांडत होते. शनिवारी दुपारी बारा वाजता साक्षी आणि तिच्या भावामध्ये मोबाईला वापरण्यावरून वाद झाला. 

दोघांनाही एकाच वेळी मोबाईल वापरायचा होता. शेवटी आईने मध्यस्थी करीत भावाकडे मोबाईल देण्यास सांगितले. त्यामुळे साक्षीला राग आला. तिने आतमधल्या खोलीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तासभर झाला तरी साक्षी बाहेर आली नाही, म्हणून तिच्या आईने घरात जाऊन बघितले असता तिच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. आईने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने साक्षीला खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला मेयोत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

हेही वाचा : कोरोना पॉझिटिव्ह युवकाचा राजधानी एक्‍स्प्रेसमधून प्रवास 

 

मोबाईलचा मोह टाळायला हवा. पालकांनी विशेष करून याकडे लक्ष द्यायला हवे. सध्या स्मार्टफोनवर गेम खेळण्याची सवय मुलांना जडलेली आहे. त्यातून मोबाईलचे वेड लागते. कालांतराने मोबाईल न मिळाल्यास त्याला नैराश्‍य येते. त्यातून नकारात्मक विचार डोक्‍यात येतात. अशातून वाईट घटना घडतात. त्यामुळे अनर्थ टाळण्यासाठी पालकांनी वेळीच सावध भूमिका घ्यायला हवी. 
-प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by poisoing