खबरदार! बर्ड फ्लू, चिकनबाबत अफवा पसरवली तर; या मंत्र्याने दिला चक्क कारवाईचा इशारा

नरेंद्र चोरे
Monday, 25 January 2021

यासंदर्भात अफवा पसरविल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. चिकन ७० डिग्री तापमानात शिजविल्यानंतर ते पूर्णपणे खाण्यायोग्य असते. नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता बिनधास्त चिकन व अंडी खावी.

नागपूर : काही लोक चिकन व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो, असा दुष्प्रचार करीत आहेत. अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या वतीने रविवारी फुटाळा येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात आयोजित बर्ड फ्लू जनजागृती अभियानाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. कुक्कुटपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यावर हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, काही लोक चिकन व अंड्यांमुळे बर्ड फ्लूसारखा आजार होत असल्याचा खोटा प्रचार करीत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

जाणून घ्या - Success Story : आईने अंगावरील सोनं गहाण ठेवून शिकवले पोरीला अन् तिने कमालच केली

यासंदर्भात अफवा पसरविल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. चिकन ७० डिग्री तापमानात शिजविल्यानंतर ते पूर्णपणे खाण्यायोग्य असते. नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता बिनधास्त चिकन व अंडी खावी. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री उद्योगाला होणाऱ्या नुकसानापासून स्वतःला वाचविण्यासाठी व्यावसायिकांनी विमा करवून घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अंडी, चिकन प्रथिनांचे स्त्रोत

कोरोनाकाळात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी व चिकन ही मोठ्या प्रमाणात प्रथिनांचे स्त्रोत आहेत. ती खाल्ल्यामुळे बर्ड फ्ल्यू होत नाही. नागरिकांनी बिनधास्त अंडी-चिकन सेवन करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व मत्स्य विकास मंत्री सुनील केदार यांनी नागरिकांना केले आहे.

शासन, कुक्कुटपालन व्यावसायिक आवश्यक खबरदारी घेताहेत

देशातील सर्वाधिक पोल्ट्रीची निर्यात ही महाराष्ट्रातून केली जाते. त्यामुळे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा मोठा आधार आहे. २००६ नंतर देशातील कुक्कुटपालन क्षेत्र, व्यावसायिक व शेतकऱ्यांमध्ये कुक्कुटपालनाच्या व्यवस्थापनांत क्रांतिकारक बदल झाला आहे. कोंबड्यांचे मांस व अंडी ही अतिशय उत्तम दर्जाची प्रथिने आहेत. फार्मवर रोग होऊ नये यासाठी शेतकरी, शासन व कुक्कुटपालन व्यावसायिक सर्व आवश्यक खबरदारी घेत असल्याचेही सुनील केदार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Kedar said we will take action against those who spread rumors bird flue