
आई शेतमजुरी करून संसाराला हातभार लावते. या दांपत्यांना दोन मुलीच. मयुरी ही मोठी मुलगी. तिच्यातील शिक्षणाची गोडी बघून आईने पुढाकार घेतला. अंगावर असलेले थोडफार सोन गहाण ठेवून शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठविले.
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : आई शेतमजुरी करायची तर वडील एकरभर शेतात राबून कुटुंब चालवायचे. शासनाकडून मिळालेल्या बेघरात त्यांच्या आयुष्याची चालढकल सुरू होती. दोन्ही मुलीच. अशात त्यांच्या लग्नापुरतं काय करता येईल इतकाच तो विचार. पण, एका पोरीची शिक्षणातील गोडी आईने बघितली. आपल्या अंगावर असलेले थोडफार सोनं गहाण ठेवून तिने तिला शिकायला पाठवलं अन् पोरीने कमालच केली.
शनिवारी (ता. २३) स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेचा निकाल आला. परिसरात मयुरीच्या यशाचीच चर्चा सुरू झाली. पोरीन कमाल केली. या भावनेने गरीब मायबापाला भरून आलेले बघून गावकरीही आनंदित झाले. तालुक्यातील सोमपनल्लीसारख्या खेड्यातील मयुरी केंद्र शासनाच्या केंद्रीय सुरक्षा दलात सैनिक म्हणून रुजू होणार आहे.
अलीकडे शासकीय नोकरी मिळवण कठीणच. पण, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तरुण तसूभरही मागे हटायला तयार नाहीत. गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली अगदी लहानस गाव. मयुरी महेंद्र सोमनकर या तरुणीवर परिसरातून सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. शनिवारी स्टॉफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आला. त्यात मयुरी उत्तीर्ण झाली. मयुरीचे वडील महेंद्र हे अल्पभूधारक शेतकरी आहे. एक एकर शेती करून ते कुटुंब चालवितात.
आई शेतमजुरी करून संसाराला हातभार लावते. या दांपत्यांना दोन मुलीच. मयुरी ही मोठी मुलगी. तिच्यातील शिक्षणाची गोडी बघून आईने पुढाकार घेतला. अंगावर असलेले थोडफार सोन गहाण ठेवून शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठविले. परंतु, ते पैसे किती दिवस पुरणार. शेवटी मयुरीने काही ठिकाणी काम करीत आपले शिक्षण सुरू ठेवले.
विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
सध्या ती मुक्त विद्यापीठातून बी.एच्या अंतिम वर्षाला आहे. काम करीत, शिक्षण घेत तिने अभ्यास केला. अशातच स्टाफ सिलेक्शन आयोगामार्फत केंद्रीय सुरक्षा दलाच्या जागा निघाल्या. अन् तिने तो अर्ज भरला. अभ्यासाच नियोजन करीत परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात ती उत्तीर्ण झाली. या परिसरात नोकरी मिळविणारी मयुरी पहिलीच आहे.
सोमनपल्ली येथील काही तरुण पुण्यात शिकतात. मागील दिवाळीत ते गावाकडे परतले असता गावातील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सल्तनत नावाचा उपक्रम राबविला. सुरेश सातपुते यांच्या नेतृत्वात या उपक्रमाच्या माध्यमातून मयुरीला मोठीच मदत झाली. सल्तनतने तिला अभ्यासाच्या नियोजनासोबत आर्थिक मदत केली. तिच्या या यशात सल्तनतचा वाटा असल्याचे मयुरी सांगते.
तालुक्यातील सोनापूर देशपांडे येथील शुभांगी चौधरी या तरुणीनेदेखील स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. तिची सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. शुभांगी व मयुरी या दोन तरुणींनी मिळविलेल्या या यशाचे तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.
संपादन - नीलेश डाखोरे