
भाजपच्यावतीने अतिशय बारकाईने नियोजन करून निवडणूक लढली जाते. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी इच्छुकांच्या नावासाठी सर्व्हे केला जातो. सध्या महापालिकेत भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक आहेत.
नागपूर : भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात तब्बल ८० टक्के नगरसेवकांची कामगिरी जेमतेम आढळून आली आहे. या सर्वेक्षणाचा आधार घेऊन आगामी निवडणुकीत तिकीट वाटप केल्यास तब्बल ८६ नगरसेवकांना घरी बसावे लागू शकते.
भाजपच्यावतीने अतिशय बारकाईने नियोजन करून निवडणूक लढली जाते. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी इच्छुकांच्या नावासाठी सर्व्हे केला जातो. सध्या महापालिकेत भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर आली असल्याने काही खासगी संस्था तसेच काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यात ८० टक्के नगरसेवकांची कामगिरी असमाधानकारक आढळल्यामुळे नेत्यांची चिंता वाढली आहे. या हिशेबाने विद्यमान ८६ नगरसेवक निष्क्रिय ठरले आहेत.
हेही वाचा - अनधिकृत बांधकामधारकांसाठी महत्वाची बातमी, २०२०...
मुंबई आणि दिल्लीतील एका कंपनीमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आला. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात सहा मंडळ आणि ३८ प्रभाग आहेत. अंदाजे ३० लाख मतदार आहेत. विद्यमान सत्ताधारी भाजपचा एक वर्षाचा कार्यकाळ अद्याप शिल्लक आहे. सन २०२२ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. सर्वेक्षणात भाजप नगरसेवकामुळे तुम्ही किती खुश आहात आणि भाजपच्या कामांनी तुम्ही किती प्रभावित झाला असे दोन प्रश्न विचारण्यात आले होते. यात भाजप नगरसेवकांविषयी नाराजी असल्याचे स्पष्ट मत नोंदवले असल्याचे समजते. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यानंतर सर्वेक्षणाचा अहवाल पक्षासमोर सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे काही बैठका आणि पक्षाच्या व्यासपीठावरून भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी तुमच्याविषयी लोकांमध्ये नाराजी असल्याचे सांगून अनेक नगरसेवकांना इशाराही दिला आहे.
हेही वाचा - उपराजधानीत पुन्हा कोरोनाचा उद्रेक; आजची रुग्णसंख्या बघून सरकेल पायाखालची जमीन
महिला नगरसेवकांची संख्या जास्त -
जेमतेम कामगिरी असलेल्यांमध्ये महिला नगरसेवकांची संख्या जास्त आहे. अनेकांनी निवडणूक आल्यानंतर प्रभागातील नागरिकांशी संपर्क ठेवला नाही. काही नगरसेविकांचे पतीच कारभार बघत आहेत. अनेक नगरसेविका महापालिकेच्या मुख्यालयातही फिरकल्या नाहीत. काही नगरसेवकांनी सर्व भार अनुभवी नगरसेवकांवर टाकून दिला असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले. तक्रार करायला येणाऱ्यांची बोळवण करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने अनेक नागरिकांना आपल्या नगरसेवक कोण हेही ठाऊक नाही.