तो निघाला कोरोना सर्वेक्षणाला आणि दारातच गाठले मृत्यूने! उन्हाचा तडाखा, कामाचा ताण की...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आशा सेविकांसोबत कोरोना सर्वेक्षण पथकातील महापालिकेचा कर्मचारी आज सकाळी दगावल्याने खळबळ माजली. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

नागपूर : कोरोनाने जनमानस धास्तावले आहे. मात्र आरोग्य विभागात काम करणारी मंडळी आपले काम चोख बजावत आहेत. त्यातच उपराजधानीत दिवसेंदिवस सूर्य आग ओकतो आहे. कोरोना सर्वेक्षण करणा-यांवर कामाचा खूप ताण आहे. अशातच काम करायला घराबाहेर पडणा-या त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला असेल, या विचाराने सगळे अस्वस्थ झाले.
आशा सेविकांसोबत कोरोना सर्वेक्षण पथकातील महापालिकेचा कर्मचारी आज सकाळी दगावल्याने खळबळ माजली. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे दररोज सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिकेच्या गांधीबाग झोनअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी आशा सेविकांसोबत समुंद्रे या सफाई कर्मचाऱ्याचाही पथकात समावेश होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणेच कामावर जाण्यास निघाला असताना घरीच छातीत दुखून आल्याने कोसळला. त्याला लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे निदान झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाचणी करण्यात आली. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांत खळबळ माजली. कर्मचाऱ्यांत कुजबूज सुरू असतानाच त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

सविस्तर वाचा - सावली सोडणार तुमची साथ

काही दिवसांपासून समुंद्रे यांना बरे नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. छातीतील दुखणे ऍसिडिटीचा त्रास असेल, असे समजून समुंद्रे यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वीही त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surveyor of corona died