निलंबित शिवसेनेचा शहरप्रमुख कडवच्या पत्नीला अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

एका तरुणाला रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सहा लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पाचवा गुन्हा सीताबर्डी ठाण्यात दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. त्याच्या मालकीची दोन मर्सिडिज कार व एक हार्ले डेव्हीडसन ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

नागपूर : शिवसेनेचा निलंबित केलेला खंडणीबाज शहर प्रमुख मंगेश कडव याने शिवसेना पक्ष फंडाच्या नावाखाली कोट्यवधीची माया कमावलेली आहे. लाखो रुपये मंगेशने पत्नी रूचिता व तिच्या नातेवाईकांना दिले होते. रूचिताच्या नावावर विक्री केलेल्या फ्लॅटची रजिस्ट्रीसुद्धा केली होती. सोमवारी गुन्हे शाखा पोलिसांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याची पत्नी रुचिता मंगेश कडव हिला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी शिवसेना माजी शहरप्रमुख मंगेश कडव याच्यावर 25 लाख घेतल्याचा आरोप करण्यात आला. तेव्हापासून कडव चर्चेत आला होता. सोमवारी एका तरुणाला रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सहा लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पाचवा गुन्हा सीताबर्डी ठाण्यात दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. त्याच्या मालकीची दोन मर्सिडिज कार व एक हार्ले डेव्हीडसन ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

जाणून घ्या - तीन थोरल्या बहिणी, दोघींच्या लग्नानंतर तिसरीची चिंता अन्‌ वडिलांचे उतारवय, अशात मुलाने घेतला हा निर्णय...

रूचिताचे नाटक, पोलिसांचा हिसका

मंगेशची पत्नी रुचिता ही छातीत दुखण्याचे निमित्त करून सदरमधील व्हीम्स रुग्णालयात दाखल झाली होती. सोमवारी दुपारी सुटी होऊनती रुग्णालयाबाहेर पडताच गुन्हे शाखेच्या महिला पथकाने तिला घेरले. त्यावेळी तिने महानाट्य केले. मात्र, महिला पोलिसांनी हिसका दाखवताच चुपचाप पोलिस वाहनात बसल्याची माहिती आहे. मंगेश कडव अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. 

मंगेश गुन्हेगारी जगतात सक्रिय

मंगेश कडव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. 2003 पासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. तो छोट्या टोळ्या बनवून गुंडगिरी करीत होता. टोळीचा प्रमुख असल्यामुळे तो वाटमारी व लूटमार करीत होता. मात्र, काही कालावधितच तो मोठमोठ्या प्रॉपर्टीवर कब्जा मारणे, खंडणी वसूल करणे, हप्ता वसुली करणे, तीष्ण हत्यार दाखवून दमदाटी करण्यापर्यंत हिंमत करीत होता. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असतानाही शिवसेनेने त्याची शहरप्रमुखपदावर नियुक्‍ती केली होती.

हेही वाचा - पाहुणा म्हणून आलेल्या आतेभावाने केला बलात्कार...

आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल

मंगेश कडव याच्यावर आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. यापैकी पाच गुन्हे नुकतेच दाखल झाले, तर सात गुन्हे जुने आहेत. मंगेशवर आणखी जवळपास 12 गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडवला अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे घातले आहेत. मात्र, तो गुंगारा देत आहे. पोलिसांनी कडवची लक्‍झरी कार जप्त केली आहे. ही कार मंगेशची पत्नी रुचिताच्या बहिणीच्या घरातून जप्त केली आहे. यापूर्वी पोलिसांनी मंगेशच्या तीन महागड्या कार जप्त केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspended Shiv Sena mayor Kadwan's wife arrested