नवरात्रोत्सवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना, गरबा, दांडियावर मर्यादा

नीलेश डोये
Wednesday, 30 September 2020

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण निश्चित केले आहे.

नागपूर  : नवरात्रौत्सव, दुर्गा पूजा तसेच दसरा सण साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतानाच गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंडप उभारण्यात यावे. देवीच्या मू्र्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती मूर्तीसाठी २ फुटाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
 

प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी आदी जनजागृतीपर प्रदर्शनास प्राधान्य द्यावेत. ध्वनी प्रदूषणासंदर्भात नियमांचे तंतोतंत पालन करावे. देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदीद्वारे व्यवस्था करावी. मंडपामध्ये एकाचवेळी पाचपेक्षा जास्त उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा जलपानाची व्यवस्था करण्यास मनाई आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडपाचे निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंग व्यवस्था करण्यात यावी. तसेच भाविकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात यावेत. देवीच्या मूर्तीचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सण, उत्सवाबाबत प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे.

दसरा, रावण दहनासाठीची गर्दी टाळा

दसरा तसेच रावण दहनाचा कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करून प्रतिकात्मक स्वरूपात आयोजित करावा. तसेच गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्याच व्यक्ती कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील. प्रेक्षकांना निमंत्रित करू नये. तसेच हा कार्यक्रम फेसबुक तसेच इतर समाज माध्यमाद्वारे प्रक्षेपित करावा, असे निर्देश देताना कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे दिलेल्या सूचना व निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take health program instead of Garba Dandiya Collector Thackeray