नागपूरच्या या वस्तीतील नागरिक भोगताहेत तीन महिन्यांपासून नरकयातना!

photo
photo

नागपूर : एरवी पावसाळा हा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. त्यामुळे सर्वच जण त्याची आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र काही लोकांसाठी हाच पावसाळा नरकयातना घेऊनही येतो. असाच काहीसा अनुभव झिंगाबाई टाकळी व गोधनीतील नागरिक सध्या घेताहेत. पावसामुळे या वस्तीत पाणी जमा होऊन असह्य दुर्गंधी सुटते. त्यामुळे अनेक कुटुंब त्रस्त आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांची समस्या जैसे थे आहे. 


जूनमध्ये मॉन्सून दाखल झाल्यापासून यंदा शहरात विक्रमी साडेबाराशे मिलिमीटर पाऊस बरसला. या पावसाचा फटका झिंगाबाई टाकळी परिसरातील अनेक वस्त्यांना बसतो आहे. या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने दुर्गंधी सुटली असून, डास व मच्छरांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. आपली आपबिती सांगताना उज्ज्वलनगरात राहणारे सदाशिव कावडकर म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला प्रचंड त्रास होतो. यावर्षी हा त्रास अधिकच वाढला आहे. आमच्या मोहल्यातील सर्वच जण त्रस्त आहेत. धो-धो पाऊस आला की घरासमोरून अक्षरशः नदी वाहाते. पावसाच्या पाण्यात गडरचे पाणी जात असल्याने घाण वास येतो. त्यामुळे जेवताना खूप त्रास होतो. पंखे लावले तरीही दुर्गंधी जात नाही. शिवाय डास व मच्छरांचा हैदोस असल्यामुळे आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


उज्ज्वलनगरातीलच मुन्ना कावडकर व अजाबराव पंडागरे यांनीही पावसाच्या पाण्याचा खूप त्रास असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जागोजागी गडरलाईन खुली आहे. त्यात पावसाचे पाणी शिरले की संपूर्ण परिसरात घाण वास येतो. याशिवाय लेआऊटमध्ये अंधाराचीही मोठी समस्या आहे. एक वर्षापूर्वी इलेक्ट्रिक खांब बसविण्यात आले. मात्र त्यावर अजूनपर्यंत दिवे लागले नाही. परिसरात मोठमोठे साप असल्यामुळे रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडायलाही भीती वाटते. दिवे लावण्यासंदर्भात नगरसेवकांना वारंवार अर्ज व विनंत्या केल्या. त्याउपरही समस्या सुटली नसल्याचे ते म्हणाले. 

रिकामे भूखंड ठरताहेत त्रासदायक 


परिसरात अनेक जणांनी गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी केले आहेत. हे प्लॉटच दुर्गंधीचे माहेरघर बनले आहे. राजेश्वर नगरातील एक नागरिकाच्या घराच्या चारही बाजूने रिकामे भूखंड आहेत. तिथे घाण पाणी जमा होत असून, ते दुर्गंधीयुक्त पाणी वॉल कंपाऊंडमधून झिरपून त्यांच्या अंगणात येते. पावसाळा सुरू झाल्यापासून त्यांचे घर घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात आहे. 
 
संपादन : प्रशांत रॉय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com