सरकारी जमिनींवर अतिक्रमणाचा बोलबाला, बसस्थानकाच्या इमारतीचे काय झाले बोला !

भिवापूरः जिर्णावस्थेतील शहरातील बसस्थानक.
भिवापूरः जिर्णावस्थेतील शहरातील बसस्थानक.

भिवापूर (जि.नागपूर):तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त बसस्थानकाची इमारत असावी. ही मागील ४० वर्षांपासून भिवापूरकरांकडून होत असलेली मागणी क्षेत्रातील लोकप्रतिनिधिंनी कधीच गांभिर्याने घेतली नाही. विविध कारणे पुढे करून ते या प्रश्‍नाला नेहमीच बगल देत आलेत. डॉ.श्रावण पराते, स्व.वसंतराव ईटकेलवार, राजेंद्र मुळक ही मंडळी आमदार व मंत्री असताना भिवापूरकरांकडून बसस्थानकाची मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर सुधीर पारवे सलग दोनदा आमदार झालेत. त्यांचे जन्म गाव असल्याने बसस्थानक इमारतीचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा सर्वांना विश्वास होता. परंतू त्यांनीही भिवापूरकरांच्या तोंडाला पानेच पुसलीत. आता चेंडू आमदार राजू पारवे यांच्या कोर्टात आहे. भिवापूर  हे त्यांचेही जन्म गाव असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन चाळीस वर्षांपासून केली जात असलेली मागणी पूर्ण करावी अशी जनभावना आहे.

अधिक वाचाः जनतेला ‘कॅश’ करण्यासाठी भाऊंनी लढवली शक्कल; पाच हजार मिळवून देतो, कागदपत्रे जमा करा

दिसली जागा, कर अतिक्रमण
शहराला लागून असलेल्या शासकीय जमिनी अतिक्रमणाने वेढल्या आहेत. खाली जागा दिसली की कर अतिक्रमण. शहरात मध्यंतरी ही मानसिकता चांगलीच वाढीस लागली होती. त्यातच अतिक्रमण करणाऱ्यांना काही  स्थानिक राजकारण्यांचे व धंदेवाईक समाजसेवकांचे पाठबळ मिळत गेल्याने त्यांचे हौसले बुलंद होत गेले.  प्रशासनाला ते जुमानत नव्हते. ही परिस्थिती आजही कायम आहे.  एखाद्या अधिकाऱ्याने कारवाई करण्याचे धाडस दाखविलेच तर ‘व्होट बँक’ हिरावू नये म्हणून स्थानिक राजकीय मंडळी कारवाई थांबविण्यासाठी संबंधित अधिका-यांवर दबाव आणतात. त्यांच्या या भूमिकेमुळेच शहरातील बहुतांश मोक्याच्या जमिनींवर अतिक्रमणाचा बोलबाला आहे. अनेकांनी बसस्थानक व्हावे, याबद्दल दै.‘सकाळ’जवळ मत व्यक्त केले.

मार्गातील अडसर दूर करावा
जागेची समस्या असल्यास बसस्थानकासाठी सोयीची ठरु शकेल, अशा जागेची निवड करुन ती अतिक्रमण मुक्त करावी. विकासकामांसाठी अतिक्रमण आड येत असल्यास प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहेस असे मत भिवापूर शहर भाजपचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी व्यक्त केले, तर स्थानिक नेतृत्वात इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे बसस्थानकाचा प्रश्‍न रेंगाळत असून शहर व तालुक्याच्या लोकसंख्येचा विचार करता सुसज्ज बसस्थानक इमारत होणे गरजेचे आहे. जागेच्या संदर्भात अतिक्रमणाचा अडसर आहे हे खरे आहे. परंतू प्रशासनाने हा अडसर दूर करुन बसस्थानक इमारतीचा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षा शिवसेनेचे नगरसेवक कैलास कोमरेल्लिवार यांनी व्यक्त केली.

अधिक वाचाः रस्त्याच्या बाजूला वाहने उभी केलीत, आम्ही चोरी केली का, वाहतुकदारांचा प्रश्‍न

 सातत्याअभावी प्रश्‍न रखडला
बसस्थानकाची मागणी जुनी असली तरी त्यात सातत्य नसल्याने प्रश्‍न सुटू शकला नाही. इमारतीकरीता जागेची अडचण निर्माण होत असेल तर महसूल आणि वन खात्याशी समन्वय साधून ती दूर करता येवू शकते. जुने अतिक्रमण असल्यास ते हटविताना त्यांची  इतरत्र सोय करता येईल. मात्र बस स्थानकाचा विषय मार्गी लागणे आवश्‍यक आहे.
दिलीप गुप्ता
अध्यक्ष, शहर काँग्रेस कमेटी

विकासकामात अडथळा येता कामा नये
जागा आरक्षित करुन त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची सुरुवातीपासूनच काळजी घेतली असती तर आज बसस्थानक, न्यायालय इमारतींचे बांधकाम जागेअभावी रखडले नसते. प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई करुन बसस्थानकाचा मार्ग मोकळा करावा.
सचिन चव्हाण
जिल्हाध्यक्ष,
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com