तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उचललाच नाही प्रवास भत्ता, काय असावे कारण? 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

गडचिरोली येथून उमरेड येथे रुजू झाल्यानंतर उमरेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांनी 2018-2019 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच इतर परिसरात दौरे केल्याची दौरा दैनंदिनी, हजेरीपत्रक आणि व्हिजिट नोट याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपी भगत यांनी माहिती अधिकारात केली होती.

नागपूर : ग्रामीण भागातील गरीब महिला आणि मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण, अद्ययावत व परिणामकारक आरोग्यसेवा पुरेशा प्रमाणात पोहोचविण्याचा उदात्त हेतू राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आहे. 2005 हे अभियान सुरू झाले आहे. या मिशनअंर्तत आशांचे प्रशिक्षण, लसीकरण मोहीम, असे आरोग्यदायी अभियान राबवताना तालुका अधिकारी यांना दैनंदिन प्रवासभत्ता दिला जातो. मात्र, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची मंजुरी घ्यावी लागते. जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर कार्यालयात दैनंदिनी सादर केली; मात्र उमरेड तालुक्‍यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रवासभत्त्याची उचल केली नाही, अशी माहिती माहिती अधिकारातून दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवासभत्त्याची उचल झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. 

गडचिरोली येथून उमरेड येथे रुजू झाल्यानंतर उमरेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांनी 2018-2019 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच इतर परिसरात दौरे केल्याची दौरा दैनंदिनी, हजेरीपत्रक आणि व्हिजिट नोट याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपी भगत यांनी माहिती अधिकारात केली होती. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांनी माहिती अधिकारी अतिरिक्त जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या माहितीतून हजेरीपत्रक दिले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धरमठोक यांनी प्रवास भत्ता उचल करण्यात आला नाही, अशी माहिती दिली आहे. 

हीच माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी यांच्याकडे केली असता, येथील माहिती अधिकारी एन. आर. नाईक यांनी ही माहिती वैयक्तिक असल्यामुळे देणे बंधनकारक नसल्याचे उत्तर दिले. एकाच खात्यामध्ये एक माहिती अधिकारी माहिती देतो, तर दुसरा अधिकारी माहिती देत नाही. यावरून अर्थकारण गुंतले असावे या शंकेची पाल चुकचुकली.

लग्न करताय? यवतमाळकरांसाठी हा आहे स्पेशल "कोरोना पॅकेज' 

प्रवासभत्त्यापोटी तीस ते चाळीस हजार रुपयांची उचल करण्यात आली आहे. माहिती अधिकारातून प्रवासभत्ता उचल केला नसल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली. मात्र, पूर्वीच्या तारखेला आडमार्गाने मंजुरीपत्र मिळवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रवासभत्त्याची उचल केली आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक म्हणाले. 
 

माहिती अधिकारातील माहिती खोटी आहे का? 

सामाजिक कार्यकर्ते गोपी भगत यांनी माहिती अधिकारात अर्ज सादर केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी दैनंदिनी मिळाली आहे. परंतु, प्रवासभत्त्याची उचल केली नाही, असे उत्तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माहिती अधिकारातून दिले आहे. यामुळे माहिती अधिकारातून खोटी माहिती मिळाली का, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taluka health officials refuse travel allowance!