नागपूर जिल्हयातील आता "हे' तालुके हादरले, नागरिकांत प्रचंड भीती...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

बहुतांश वाहनचालक, पादचारी, घराबाहेर पडलेली मंडळी मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले. यावरून कोरोनाबाबत गांभीर्य दिसून येत नाही, हे सिद्ध होते. माहितीनुसार, काटोल चौबे ले-आउटमध्ये रुग्ण मिळाला व तेथील परिसर सील केल्याने आपण सुरक्षित आहोत, असे जनतेला वाटत आहे.

नागपूर ग्रामीण : नागपूर शहरात संसर्ग झपाटयाने वाढत असताना जिल्हा सुरक्षित राहिल असा ग्रामीण जनतेचा अंदाज होता. परंतू दोन महिन्यांनंतर जिल्हयात कोरोना मोठया वेगाने फोफावत असल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरात हिंगणा, कामठी, काटोल, नागपूर आदी तालुक्‍यात कोरोना मोठया प्रमाणात शिरत असताना कुही तालुक्‍यालाही संसर्ग झाला आहे. मंगळवारी काटोल येथे आठ, वाडीत 1, कुहीत एक, कामठीत एक रूग्ण आढळले आहेत.

अधिक वाचा : रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले

काटोलात आढळले 8 नवे रुग्ण; रुग्णसंख्या झाली 23
काटोल : शहर व तालुक्‍यात कोविड 19 संसर्ग नियंत्रित असताना आठवड्यात सलग तीन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत असून, आज मंगळवारी आठ 8 रुग्ण निघाल्याने कोरोनाचा महास्फोट झाला आहे. केसेस सतत वाढत असल्याने प्रशासन, नागरिक चिंतेत आहे. आपत्ती नियोजन समितीचे सभा व प्रभावी नियोजन व उपाय याबाबत आज रात्रीपर्यंत वरिष्ठांशी चर्चा सुरू होती. शहरात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 19 तर ग्रामीण भागातसुद्धा झिलपा 2, पानवडी 1, मंगळवारी कोंढाळीच्या एका रुग्णाने वाढ झाल्याने, ग्रामीण भागात चार अशा एकूण 23 रुग्णांची नोंद आहे. चिंतेचा विषय असताना जनतेने पूर्णपणे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रशासनाने मत व्यक्त केले आहे. यापूर्वी रिधोरा कनेक्‍शनचे शहरात चार रुग्ण आढळले होते. ती चेन पूर्णपणे "ब्रेक' झाल्यानंतर आता सहा दिवसांपासून नवीन मालिका सुरू झाली आहे.

अधिक वाचा : रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले

जनतेचे मास्ककडे दुर्लक्ष
आज शहरात फेरफटका मारला असता, बहुतांश वाहनचालक, पादचारी, घराबाहेर पडलेली मंडळी मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले. यावरून कोरोनाबाबत गांभीर्य दिसून येत नाही, हे सिद्ध होते. माहितीनुसार, काटोल चौबे ले-आउटमध्ये रुग्ण मिळाला व तेथील परिसर सील केल्याने आपण सुरक्षित आहोत, असे जनतेला वाटत आहे. शहरात जनता कर्फ्यू असताना नागरिक रस्त्यावर दिसत होते. प्रसाशन ध्वनिक्षेपणाच्या माध्यमातून सूचना देत होते. गांभीर्य असणारे नागरिक शासनाचे दिशानिर्देशाचे पालन करीत असताना सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अशोक गराटे यांनी केले. नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष सुभाष कोठे, सर्व सभापती, नगरसेवक यांनी चर्चा करून जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : बारावीच्या विद्यार्थ्यांना आता फेरमूल्यांकनासाठी मिळणार ऑनलाईन प्रत

वाडीत एक, लाव्ह्यात एक पोलिस कर्मचारी "पॉझिटिव्ह'
वाडी : येथील धम्माकीर्तीनगर व लाव्हा ग्रामपंचायत क्षेत्रातील महादेवनगर येथे एकेक कोरोना
पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली. वाडी नगर परिषद क्षेत्र तीन महिने सुरक्षित राहिल्यानंतर अचानक सुरक्षानगरातून कोरोनाबाधित महिलेपासून संसर्गाची सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा सुरक्षानगर येथील महिला, नवनीतनगर येथील पुरुष, सत्यसाई सोसायटीतील वीज कर्मचारी अशा चौघांना आतापर्यंत बाधा झाली असतानाच मंगळवारी पुन्हा एक रुग्ण धमकीर्तीनगर येथे पॉझिटिव्ह आढळल्याने आता वाडीत बाधित रुग्णाची संख्या 5 झाली आहे. दुसरीकडे लावा ग्रामपंचायत क्षेत्रात आतापर्यंत एकही बाधित रुग्ण नव्हता. परंतु, मंगळवारी दुपारी महादेवनगर येथील एक पोलिस कर्मचारी संक्रमित स्पष्ट झाल्याने लाव्हा परिसरातही खळबळ उडाली आहे. खास बाब म्हणजे हे दोन्ही संक्रमित मित्र असल्याचेही समजते. धम्मकीर्तीनगर येथील 32 वर्षीय युवक आई, बहिणी व राज्य राखीव पोलिस दल हिंगणा येथे कार्यरत असलेला भाऊ असे संयुक्त कुटुंब आहे. त्याचा महादेवनगर येथील शहर पोलिस दलात शिपाई असलेला युवक मित्र असल्याने नेहमी सोबतच घरी जाणे-येणेही आहे. या दोघांना 2 दिवसांपूर्वी बरे वाटत नसल्याने सहज वाडीतील एका खासगी पॅथॉलॉजीमध्ये दोघांनीही सोमवारी तपासणी केली असता, मंगळवारी तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच पॅथॉलॉजी संचालकानाही धक्का बसला.

अखेर कुही तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव
वेलतूर : अखेर कुही तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुहीलगतच्या सिल्ली येथील युवकामुळे हा कोरोना तालुक्‍यात आला आहे. तालुक्‍यातील सिल्ली गावातील पॉझिटिव्ह निघालेला तरुण रत्नागिरी जिल्ह्यातून आला. तो वीज वितरण कंपनीमध्ये कामाला आहे. तो आता रत्नागिरीवरून नागपूर जिल्ह्यात बदलून आला. त्याला ताप आल्याने हे बिंग फुटले. सध्या तो बेला (उमरेड) येथील वीज वितरण कंपनीमध्ये कामाला जात असल्याची माहिती आहे. त्याला क्‍वारंटाइन करण्यात आले आहे.

कामठीत आढळला रुग्ण
कामठी : कोळसाटाल येथे पुन्हा एका युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे आज मंगळवारी आलेल्या अहवालात निष्पन्न झाले. पॉझिटिव्ह अहवाल आलेला हा युवक बुटीबोरी येथील इंडोरमा
कंपनीत नोकरीला होता. तालुका प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारातील नऊ सदस्यांना क्‍वारंटाइन केले असून हा रुग्ण राहत असलेला परिसर सील केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The talukas of Nagpur district are now shaken, there is great fear among the citizens.