शिक्षकांच्या बदल्या फिक्स?

नीलेश डोये
Thursday, 15 October 2020

आज दुपारी १२ वाजेपर्यंत बदली करता अर्ज करायचा होता. परंतु प्रक्रिया रात्रीपर्यंत चालल्याची माहिती आहे. काहींना फायदा पोहोचण्याकरता रात्रीपर्यंत खटाटोप चालल्याची चर्चा आहे. ही प्रक्रिया अतिशय गुप्तपणे राबविण्यात आली.

नागपूर : जिल्हा परिषदेतील विस्थापित व रॅण्डम शिक्षकांच्या बदलीचा विषय गेला आठवडाभरापासून चर्चला आहे. शुक्रवारपासून बदलीकरता समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. आज अर्ज करण्याचा शेवटा दिवस होता. काहींचे अर्ज वेळ गेल्यानंतर स्वीकरण्यात आले असून बदलीच्या जागा ‘फिक्स’ असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेत ९० रिक्त जागांवर बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यातील ४६ पदे ही अधिसंख्य शिक्षकांची असून, आंतरजिल्हा बदलीने ४४ शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. नवीन पदस्थापना देताना ग्रामविकास विभागाने विस्थापित व रॅण्डम शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना शासनाच्या आहे.

प्रशासनाने पूर्वी बदल्या करताना काही निवडक पंचायत समितीच्या ९० जागाच खुल्या केल्या होत्या. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता. जिल्ह्यात रिक्त असलेल्या १९० जागा खुल्या कराव्यात, अशी संघटनांची मागणी होती. दरम्यान १४ जागा अदला-बदला करून खुल्याकरण्यात आल्या. परंतु संघटनांनी ते मान्य केले नाही. मंत्री सुनील केदार यांच्याकडे विषय गेला.

१२ जागा झाल्या खुल्या; विस्थापित व रॅण्डम शिक्षकांची बदली

संघटनांनी शिक्षण सभापतींच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सभापती १४० जागा खुल्या करण्यासाठी आग्रही होत्या. परंतु सीईओ योगेश कुंभेजकर यांनी प्रथम स्पष्ट नकार दिला. नंतर मात्र त्यांनी मध्यस्थाची भूमिका घेत १२ जागा पुन्हा खुल्या करीत १०२ जागांवर बदली प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली. आज दुपारी १२ वाजेपर्यंत बदली करता अर्ज करायचा होता. परंतु प्रक्रिया रात्रीपर्यंत चालल्याची माहिती आहे. काहींना फायदा पोहोचण्याकरता रात्रीपर्यंत खटाटोप चालल्याची चर्चा आहे. ही प्रक्रिया अतिशय गुप्तपणे राबविण्यात आली.

विभागाशी संबंधितांचे फोन बंद होते तर शिक्षणाधिकारी यांनी प्रतिसादच दिला नाही. यात मोठी तडजोड असल्याचीही चर्चा आहे.

१९० जागा खुल्या करा
सर्वच्या सर्व १९० जागा खुल्या करण्याची मागणी शिक्षक संघटनांची असून आज विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher transfers Fix?