अभ्यासक्रम झाला कमी मात्र शिक्षक संभ्रमात; सुधारित यादीमुळे झाला घोळ

मंगेश गोमासे 
Saturday, 31 October 2020

कोरोना काळामध्ये पहिली ते बारावीचे सत्र लांबले. या प्रकाराने विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम कमी कालावधीत शिकवायचा कसा? असा शिक्षकांचा प्रश्न आहे. यामुळे अभ्यासक्रमात कपात करण्याची मागणी होऊ लागली

नागपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे कपात करण्यात आलेला अभ्यासक्रम संकेतस्थळावर टाकण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी अभ्यासक्रमांची सुधारित यादी टाकण्यात आली. या यादीत अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, यावेळी या अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा झाली नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

कोरोना काळामध्ये पहिली ते बारावीचे सत्र लांबले. या प्रकाराने विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम कमी कालावधीत शिकवायचा कसा? असा शिक्षकांचा प्रश्न आहे. यामुळे अभ्यासक्रमात कपात करण्याची मागणी होऊ लागली. यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शिक्षकांना सुधारित अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. 

शिक्षकांनी त्यात २५ टक्के कपात असेलेला नवा अभ्यासक्रम तयार करून दिला. यानंतर या अभ्यासक्रमाला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे अभ्यासक्रम संकेतस्थळावर टाकण्यात आले. मात्र, एका आठवड्यापूर्वीच अभ्यासक्रमाची सुधारित यादी टाकण्यात आली. या यादीत अभ्यासक्रम पूर्वीपेक्षाही कमी करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ऑनलाइन शिकवताना या अभ्यासक्रमातील बराचसा भाग शिकविण्यात आलेला आहे. त्यामुळे नव्याने बदल झाल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

गणित अध्यापक परिषदेचे निवेदन

नववी आणि दहावीच्या गणित विषयाच्या कमी केलेल्या पाठयक्रमाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याबाबत नागपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या शिष्टमंडळाद्वारे गुरुवारी साहाय्यक शिक्षण संचालक मेंढे यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. 

हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

एस.सी.ई.आर.टी.च्या संकेतस्थळावर नववी आणि दहावीच्या गणित विषयाच्या २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आलेल्या पाठयक्रमाची सुधारीत यादीबाबत अधिकृत घोषणा करून निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची विनंती शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात नागपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पंचभाई, सचिव अजय पांडे, उपाध्यक्ष मिलिंद भाकरे, राधेश्याम गायधने व भैसारे सर यांचा समावेश होता. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers are in confusion as there is no announcement of course deduction