सिनेमागृहं उघडली पण बघणार काय? प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा 

मंगेश गोमासे 
Friday, 6 November 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशात मार्च महिन्यात टाळेबंदी घोषित करण्यात आली. या टाळेबंदीत चित्रपटगृहे आणि नाट्यगृहेही बंद करण्यात आली.

नागपूर. ः राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सिनेमा आणि नाट्यगृहे उघडण्याचा अचानक निर्णय जाहीर केला. मात्र, सिनेमागृहांची साफसफाई आणि नव्या चित्रपटांची ‘एन्ट्री‘ होण्यास जवळपास एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे चित्रपट शौकीन आणि नाट्यप्रेमीना ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त‘ असेच म्हणावे लागणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशात मार्च महिन्यात टाळेबंदी घोषित करण्यात आली. या टाळेबंदीत चित्रपटगृहे आणि नाट्यगृहेही बंद करण्यात आली. त्यामुळे चित्रपट आणि नाट्य शौकीनांना असलेली पर्वणी संपुष्टात आली. मात्र, चार महिन्यानंतर ‘मिशन बिगीन अगेन' अंतर्गत मालिका आणि चित्रपट कलावंतांना काम करण्यास मुभा देण्यात आली.

अधिक माहितीसाठी - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

मात्र, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहेही बंद असल्याने काम करावे तरी कसे याबाबत कलावंतांमध्ये रोष होता. त्यामुळे अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी ‘ओटीटी प्लॅटफार्म'वर चित्रपट प्रदर्शनास सुरुवात केली होती. मात्र, कलावंतांनी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली होती. 

त्यातून तब्बल नऊ महिन्यानंतर राज्य सरकारने बुधवारी राज्यात चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार चित्रपटगृहे आणि नाट्यगृह मालकांनी साफसफाईच्या कामास सुरुवात केली. चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांची स्वच्छता आणि सॅनिटाझेशन झाल्यावर सोमवारी ती उघडणार आहेत. मात्र, ‘युएफओ‘अंतर्गत चित्रपट सुरू होत असल्याने नवा चित्रपट पुढल्या शुक्रवारी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे चित्रपट शौकीन आणि नाट्यप्रेमींना पुढल्या शुक्रवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे. दुसरीकडे जेव्हा चित्रपटगृहे बंद झालीत, त्यावेळी शहरातील चित्रपटगृहात बागी-३ आणि इंग्लिश मिडीयमट हे दोन चित्रपट सुरू होते. आता ‘युएफओ‘मध्ये ते चित्रपट नसल्याने चित्रपटगृहात नवा चित्रपट पुढल्या शुक्रवारी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

पती-पत्नी, प्रेमी युगुलांची अडचण

चित्रपटगृहे सुरू होत असताना करोनामुळे सामाजिक अंतर पाळण्यासाठी त्यात ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे. या निर्णयाने चित्रपटगृहात येणाऱ्या पती-पत्नी आणि प्रेमी युगुलांची या नियमाने मोठी अडचण होणार आहे. याचे कारण एक सीट सोडून चित्रपटगृत आता बसावे लागणार आहे.

सविस्तर वाचा - Success Story : आवड म्हणून सुरू केलेली शेतीच झाली करिअर; अभ्यासपूर्ण लागवडीतून मिळविले यश

राज्य सरकारच्या आदेशानंतर चित्रपटगृहाची स्वच्छता व सॅनिटाझेशन करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. सोमवारपर्यंत हे काम पूर्ण झाल्यावर चित्रपटगृहे उघडणार आहेत. मात्र, नवा चित्रपट पुढल्या शुक्रवारी प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत शौकीनांना वाट बघावी लागणार आहे.
हरिश हिरणवार, 
व्यवस्थापक, बुटी सिनेप्लेक्स.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theaters are opened now but new cinema is not released