‘गुंगीचा स्प्रे’ मारून केला दागिण्यांवर हात साफ; पोलिस हतबल

रूपेश खंडारे
Friday, 9 October 2020

दोन्ही चोरीमध्ये चोरांनी गुंगी आणणाऱ्या स्प्रेचा वापर केला होता. कारण, घरचे सदस्य जेव्हा झोपून उठले तेव्हा त्यांना डोके जड वाटत होते. पारशिवनी तालुक्यात एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत आहेत. कोंढासावली, बाबूळवाडा, पारशिवनी व दहेगाव येथे चोरीच्या घटना १५ दिवसांमध्ये घडल्या आहेत.

पारशिवनी (जि. नागपूर) : मागील पंधरा दिवसांत पारशिवनी शहर व अवतीभवती गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकामागोमाग चोरीच्या घटना सतत घडत आहे. दहेगाव येथील सुरकार व पिपळकर परिवारातील सदस्य घरी झोपले असताना चोरट्यांनी दाराची कडी तोडून दहेगाव येथील दोन घरी चोरी केली. ही घटना मंगळवारीच्या रात्री घडली. चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरीची पहिली घटना हेमराज सूरकार यांच्या घरी घडली. घरातील सर्व जण झोपले असताना चोरट्यांनी दाराची कडी तोडून आता प्रवेश केला. घरातील कपाटात असलेले सोन्याचांदीचे दागिने चोरांनी चोरून नेले. अंदाजे ७५ हजाराचे दागिने चोरीला गेले. दुसरी घटना हिरालाल पिंपळकर यांच्या घरी घडली.

अधिक माहितीसाठी - नात्याला काळीमा फासणारी घटना, आपल्याच नातीवर अत्याचार करून आजोबाची आत्महत्या

त्यांच्या घरीदेखिल सर्व जण झोपलेले असताना दाराची कडी तोडून चोरांनी आत प्रवेश केला. कपाटातील साड्यांमध्ये लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले. दागिन्यांची अंदाजे किंमत ४६ हजार रुपये आहे. ७ हजार रुपये नगदी असा एकूण ५३ हजारांचा ऐवज चोरून नेला.

दोन्ही चोरीमध्ये चोरांनी गुंगी आणणाऱ्या स्प्रेचा वापर केला होता. कारण, घरचे सदस्य जेव्हा झोपून उठले तेव्हा त्यांना डोके जड वाटत होते. पारशिवनी तालुक्यात एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत आहेत. कोंढासावली, बाबूळवाडा, पारशिवनी व दहेगाव येथे चोरीच्या घटना १५ दिवसांमध्ये घडल्या आहेत. सर्व चोरीच्या घटनांमध्ये गुंगी आणणाऱ्या स्प्रेचा वापर करण्यात आलेला होता.

हेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून

एकाही चोरीचा तपास लागलेला नाही

पारशिवनी येथे तर चोरांनी मागील आठवड्यात दोन घरी दिवसाढवळ्या चोरी करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली. चोरांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थ प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft is rampant in rural Nagpur