यंदा शाळांना केंद्राकडून मिळालाच नाही हा निधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

समग्र शिक्षा अभियानात शिल्लक असलेल्या निधीतून गणवेशाचे वितरण केले जाते अथवा थेट निधी शिक्षण विभागाच्या खात्यात जमा करण्यात येतो. 15 जूनपासून मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. 

नागपूर : केंद्र शासनातर्फे समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निधी दिला जातो. परंतु, यंदा केंद्राकडून निधीच आला नसल्याने विद्यार्थ्यांचे गणवेश अडचणीत आले आहेत. 

इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी व आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येते. दरवर्षी शाळेचे सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाला गणवेशाबाबतचे पत्र प्राप्त होते. समग्र शिक्षा अभियानात शिल्लक असलेल्या निधीतून गणवेशाचे वितरण केले जाते अथवा थेट निधी शिक्षण विभागाच्या खात्यात जमा करण्यात येतो. 15 जूनपासून मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. 

सविस्तर वाचा - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...
 

विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने हालचाली सुरू आहे. पण, शासनातर्फे अजूनही गणवेशाबाबतचे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले नाही. दरम्यान, विद्यार्थी जरी शाळेत येणार नसले तरी, शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहणार आहे. समग्र शिक्षा अभियानातून पुस्तकेही शाळेत पोहोचली आहेत. 

75 हजार विद्यार्थी 

यूडायसनुसार जिल्हा परिषदेतील पहिली ते आठवीतील गणवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या 75 हजार 205 हजार आहे. गेल्या वर्षी 68 हजार विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 600 रुपये प्रमाणे निधी आला होता. एका विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी 600 रुपये देण्यात येतात. 

खुल्या प्रवर्गालाही गणवेश 

आरक्षित वर्गातील मुलांना व सर्व प्रवर्गातील मुलींना गणवेशासाठी निधी मिळतो. ओबीसी व खुल्या प्रवर्गातील मुलांना गणवेशाकरता यंदा जिल्हा परिषदने ससे फंडात 45 लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे यंदा सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निधी मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no funding from the center for student uniforms