‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी` मोहिमेसाठी साहित्यच नाही

राजेश प्रायकर
Tuesday, 22 September 2020

कोव्हीड -१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ सप्टेंबरपासून व्यापक प्रचार मोहीम सुरू केली. या मोहिमेची जबाबदारी महापालिकेच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना देण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय पथके तयार करण्यात आली. पहिल्या फोरीत वैद्यकीय पथके विविध भागातील घरांंना भेट देणार आहे. या भेटीमध्ये घरातील प्रत्येक सदस्याची ॲपमध्ये नोंद घेतली जाणार आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या जनजागृती मोहिमेसाठी महापालिकेकडे साहित्यच पोहोचले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. राज्यात सर्वच महापालिका क्षेत्रात ही मोहिम सुरू झाली. मात्र, नागपुरातच साहित्य पोहोचले नसल्याने महापालिका अधिकाऱ्यांपुढे मोहिम राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे या मोहिमेद्वारे घराघरात तपासणी केली जाणार असल्याने नागपूरकर या आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याचीही शक्यता बळावली आहे. 

कोव्हीड -१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ सप्टेंबरपासून व्यापक प्रचार मोहीम सुरू केली. या मोहिमेची जबाबदारी महापालिकेच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना देण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय पथके तयार करण्यात आली. पहिल्या फोरीत वैद्यकीय पथके विविध भागातील घरांंना भेट देणार आहे.

या भेटीमध्ये घरातील प्रत्येक सदस्याची ॲपमध्ये नोंद घेतली जाणार आहे. तसेच इन्फ्रारेड थर्मामीटरने घरातील सदस्यांचे शरिरातील तापमान मोजले जाईल. पल्स ऑक्सिमिटरने शरिरातील ऑक्सीजन पातळीची नोंद घेतली जाणार आहे. ताप असलेल्या कुटूंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास‌ त्याचीही पथकाद्वारे माहितीची नोंद शासन यंत्रणेकडे ठेवली जाणार आहे.

या शिवाय या प्रथम फेरीमध्ये आलेल्या वैद्यकीय पथक घरातील मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार अवयव प्रत्यारोपण तसेच दमा आदी आजारांची माहिती ते नागरिकांकडून घेणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडून फार्म पाठवणे अपेक्षित होते. एवढेच नव्हे या भेटीनंतर पथकाला राज्य शासनाकडून आलेले स्टिकर प्रत्येक घराला चिटकवायचे आहे. परंतु नागरिकांची नोंद घेणारे फॉर्म तसेच स्टिकर अद्यापही पोहोचले नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले.

नागपूर मेट्रो सुसाट! कोरोना काळातही काम वेगानं सुरु; एलएडी चौक स्टेशन प्रवासी सेवेसाठी सज्ज

राज्य शासनाकडूनच हे साहित्य मिळाले नसल्याने महापालिकेची तसेच अधिकाऱ्यांच्याही डोक्याचा ताप वाढला आहे. कोव्हीडच्या काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना आणखी एक जबाबदारी राज्य शासनाने दिली, परंतु त्यासाठी साहित्यच नसल्याने या मोहिमेअंतर्गत शहरातील सहा लाख घरापर्यंत १० ऑक्टोबरपर्यंत कसे पोहोचणार? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. यासंदर्भात प्रत्येक झोन सहायक आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना मोहिमेची माहिती दिली. ही मोहिम कशी राबवायची यावर चर्चाही झाली. परंतु साहित्यच पोहोचले नसल्याने त्यांच्यापुढे नवे आव्हान उभे झाले आहे. 
 
अपुऱ्या मनुष्यबळासह मोहिम राबविण्याचे आव्हान 
शहरात कोरोनाची बिकट स्थिती आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गुंतले आहे. एवढेच नव्हे कमी मनुष्यबळ असल्याने कंत्राटी पद्धतीने डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आता या मोहिमेत पुन्हा कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळासह ही मोहिम यशस्वी करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. 
 
नागरिकांपर्यंत पोहोचले नाही पथक 
शहरातील काही नागरिकांकडे या मोहिमेअंतर्गत तपासणीसाठी अधिकारी, कर्मचारी आल्याबाबत विचारणा केली असता कुणीही आले नसल्यचे समजले. महापालिका झोन कार्यालयाजवळील घरापर्यंतही कुणीही पोहोचले नाही. या मोहिमेबाबत माहितीही नसल्याचे हनुमाननगर झोन कार्यालयाजवळ राहणारे जगदीश पाटमासे यांंनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no literature for the campaign 'Maze kutumb-majhi jababadari'