कोरोनाने त्यांना फडातून उठवले; जगायचे कसे? विचारताहेत प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

एका मंडळात दहा कलाकार काम करतात. सुमारे पाचशे लोकांचे कुटुंब चालविणाऱ्या या व्यवसायाचे गणित कोरोनाने बिघडविले असल्याचे सांगताना, या वर्षात सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान होणार असल्याचे शाहीर माणिकराव देशमुख यांनी सांगितले.

नागपूर : शाहिरी काव्याची परंपरा फार प्राचीन असून ती आजतागायत सुरू आहे. शाहिरी वाङ्‌मय मौखिक परंपरेने आपल्या "वळीतून' किंवा "फडातून' बदलत्या जीवनसंदर्भानुसार बदलून आजही प्रवाही राहिले आहे. शाहिरी डफ गर्जायला लागला की, अगदी नसानसांत स्फुरण चढते. पण, शाहीर हा केवळ लावणी, पोवाडे गाऊन मनोरंजन करणारा कलावंत नव्हे; तर तो आपल्या कलेद्वारे समाजाचे प्रबोधन करतो. कोरोनाच्या संकटामुळे अशा समाजप्रबोधनकारांच्या आयुष्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. आता जगायचे कसे, हा एकच प्रश्न गोंधळी आणि शाहिरांपुढे आहे. 

समाजात जे काम संतांनी केले, तेच गोंधळी व शाहिरांनी केले. संत अभंग-ओव्या गातात, गोंधळी देवीचा जागर करतात तर शाहीर फटका-पोवाडा म्हणतात. इतकेच काय ते अंतर असते. विदर्भात डहाका, खडी गंमत, दंडार अशा विविध पद्धतीने शाहिरीकला जोपासणाऱ्या साधारणपणे मंडळांची कागदोपत्री नोंद असल्याची माहिती ज्येष्ठ शाहीर माणिकराव देशमुख यांनी दिली. 

एका मंडळात दहा कलाकार काम करतात. सुमारे पाचशे लोकांचे कुटुंब चालविणाऱ्या या व्यवसायाचे गणित कोरोनाने बिघडविले असल्याचे सांगताना, या वर्षात सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान होणार असल्याचे शाहीर माणिकराव देशमुख यांनी सांगितले. बदलत्या काळात जगण्यातला संघर्ष अधिकच वाढणार असल्याचे माणिकराव देशमुख म्हणाले. 

हेही वाचा : भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले... आदिवासी युवकाची करुण कथा

महाल भागात दसरारोड येथे गोंधळी समाजाचे वास्तव्य होते. काळानुरूप प्रत्येकाने स्वतःचा वेगळा व्यवसाय निवडून घेतला. आज या वस्तीत केवळ सहा ते सात कुटुंबांतील सदस्य गोंधळाच्या माध्यमातून देवीचा जागर करतात. गेल्या तीन महिन्यांच्या काळात एका गोंधळीचे सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले असल्याचे गोवर्धन बागडे यांनी सांगितले. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय असून, मुलगा व भाच्याच्या रूपाने त्यांनी हा वसा पुढच्या पिढीकडे सोपविला आहे. गेल्या तीन महिन्यांत झालेले आर्थिक नुकसान अन्‌ भविष्यात रद्द झालेल्या उत्सवांच्या मालिकेमुळे कुटुंबाचा गाडा खेचायचा कसा, हा दिव्यप्रश्न त्यांच्या पुढे आहे. 

 

शाहिरांनी केवळ इतिहासकालीन पोवाडे रचून गायले नाहीत, तर तत्कालीन सामाजिक स्थिती, विविध संघटना, समाजसेवक यांचेदेखील पोवाडे जनमानसांत लोकप्रिय केले. शाहिरीच्या माध्यमातून समाजात वीरश्री संचारावी, मनामनांतून करुणा जागवावी, देशप्रेम, धर्मप्रेम, विद्याप्रेम, संघभावना, दुर्जनद्वेष, अधर्माविषयी चीड यांची जागृती शाहिरांनी त्यांच्या कलेतून केली. शाहिरानी राष्ट्रपुरुषांचे चरित्र उजेडात तेवते ठेवण्याचा व त्यायोगे ते गुण समाजात कसे पसरतील, हा प्रयत्न केला असल्याचे सांगताना भविष्यात शाहिरांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार आहे. 
-माणिकराव देशमुख, शाहीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They ask questions about how to live