भिकाऱ्यांचे सोंग घेऊन "ते' रात्री करायचे "हे' कृत्य!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

"हे' दोघे भिकाऱ्यांप्रमाणे वेशभूषा करून घरफोडी करण्यात पटाईत मानले जायचे. त्यामुळे पोलिस यंत्रणा वैतागून गेली होती. अखेर या दोघांना अटक करण्यात तहसील पोलिसांना यश आले.

नागपूर : चोरी करण्यासाठी चोर काय क्‍लृप्त्या लढवतील याचा नेम नाही. मात्र, चोरांनी कितीही शक्कल लढवली तरी "कानून के हात बहोत लंबे' असल्याने कधी ना कधी ते जाळ्यात अडकतातच. नागपुरातही असे दोन अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

"हे' दोघे भिकाऱ्यांप्रमाणे वेशभूषा करून घरफोडी करण्यात पटाईत मानले जायचे. त्यामुळे पोलिस यंत्रणा वैतागून गेली होती. अखेर या दोघांना अटक करण्यात तहसील पोलिसांना यश आले. बबलू ऊर्फ डांगा राजाराम मोहनिया (32, रा. ह.मु. पंजाबी लाइन, भस्मासुर झोपडपट्टी, जरीपटका) व त्याचा साथीदार अभय धनराज देशपांडे (34, रा. भस्मासुर झोपडपट्टी) अशी चोरट्यांची नावे आहेत. बबलूने आतापर्यंत 10 तर अभयने 29 पेक्षा जास्त घरफोड्या केल्याचे समोर आले.

वाचा - Video : विश्व महायुद्धाचे भाकित वर्तविल्याने खळबळ...वाचा संपूर्ण बातमी

स्वयंप्रसाद जगदेवप्रसाद गुप्ता (62) असे फिर्यादीचे नाव आहे. गुप्ता यांचे जगदीश ट्रेडिंग कंपनीचे नावाने इतवारी शहीद पोलिस चौकीजवळ कार्यालय आहे. दोन जून रोजी रात्रीच्या सुमारास दोघेही भिकाऱ्याची वेशभूषा करून दुकानाजवळ झोपले. त्यानंतर दुकानाचे कुलूपकोंडा तोडून रोख रक्कम, चलनी नाणे, चांदीचे शिक्‍के असा एकूण 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी तक्रारीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी बबलू हा चार जून रोजी रात्रीच्या सुमारास भिकाऱ्याच्या वेशात संशयास्पदस्थितीत आढळून आला. यावेळी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दिलीप सागर व पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील वाघ यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदाराच्या संगनमताने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 11 हजार 200 रुपये रोख, एक लोखंडी गोदरेज कंपनीची पेटी असा एकूण 12 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी ठाणेदार जयेश भांडारकर पीएसआय स्वप्नील वाघ यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार संजय दुबे, अनिल चतुर्वेदी, पुरुषोत्तम जगनाडे, रंजित बावणे, सचिन टापरे, राजेश चोपटे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They pretend to be beggars and steal